बऱयाच वर्षांनी मराठीमध्ये पुन्हा एकदा तमाशाचा फड रंगणार आहे. लावणीमागची कथा उलगडणार आहे. लेखक विश्वास पाटील यांच्या चंद्रमुखी या कादंबरीवर बेतलेल्या चंद्रमुखी या सिनेमाची घोषणा तशी दोन वर्षापूर्वीच झाली होती. पण कोरोना लॉकडाऊनमुळे हा सिनेमा प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत होता. या सिनेमाची खरी चर्चा होती ती चंद्रमुखीच्या रूपात पडद्यावर कोणती अभिनेत्री दिसणार याची. दोन दिवसांपूर्वी या सिनेमाचे दिग्दर्शक प्रसाद ओक आणि टीमने चंद्रमुखीच्या चेहऱयावरचा पडदा हटवला आणि अभिनेत्री अमृता खानविलकर चंद्रमुखीतील चंद्रा साकारणार असल्याचे समोर आले. नुकताच अभिनेत्री मानसी नाईक हिने, मी अमृतापेक्षा चांगली चंद्रमुखी साकारली असती असे विधान केले आणि पुन्हा एकदा वादाची खपली निघाली. तर गेल्या आठवडय़ातही चंद्रमुखीसाठी प्राजक्ता माळी, सोनाली कुलकर्णी यांच्या नावाचे अंदाज बांधले जात होते. यावरूनच आता या सिनेमाचे दिग्दर्शक प्रसाद ओक याने चंद्रमुखीच्या भूमिकेवरून सुरू असलेल्या अफवांमुळे चंद्रमुखासाठी अमृताचेच नाव ठरले होते असं सांगत या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. प्रसादने त्याच्या इन्स्टापेजवर एक खास व्हिडिओ बनवून त्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

गेल्या काही दिवसात एखाद्या बहुचर्चित सिनेमावरून काही ना काही वादग्रस्त किंवा चर्चा घडवून आणणारी विधाने होत असतात. चंद्रमुखी या सिनेमाची घोषणा प्रसाद ओकने केली आणि कोरोनाचे सावट गडद झाले. चंद्रमुखी पडद्यावर येण्यासाठी दोन वर्षाची वाट पहावी लागली. आता कोरोना निवळल्यानंतर हा सिनेमा प्रदर्शित करण्याच्या हालचालींना वेग आला तसे या सिनेमाचे प्रमोशनफंडे सुरू झाले. प्रसाद ओक या पोस्टमध्ये असं म्हणत आहे की, अभिनय आणि नृत्य या दोन्ही कला असणारी अमृताच च्द्रंमुखीला न्याय देईल हा विश्वास मला होता. या भूमिकेसाठी अमृताच परफेक्ट आहे.