वृत्तसंस्था/ श्रीनगर
काश्मीरमधील डोडा जिल्हय़ात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले. मात्र, दहशतवाद्यांशी लढताना एका जवानांना हौतात्म्य पत्करावे लागले. शनिवारी रात्री दहशतवाद्यांना घेरल्यानंतर रविवारी पहाटेपासूनच प्रत्यक्ष संघर्षाला सुरुवात झाली होती. या चकमकीत एक ते तीन दहशतवाद्यांचा सहभाग असण्याची शक्मयता आहे. चकमकीत 10 आरआर, सीआरपीएफ आणि डोडा पोलिसांचे पथक सहभागी झाले होते.
16 मे रोजी काश्मीरच्या बडगाममधील अरिजल खानसाब येथे सुरक्षा दलांकडून दहशतवादी लपलेले ठिकाण सापडले. त्यापूर्वी लष्कर-ए-तोयबाचा मदतनीस जहूर वानी आणि त्याच्या इतर 4 साथीदारांनाही अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून अन्य दहशतवाद्यांचा सुगावा लागल्यानंतर सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाकडून मोर्चेबांधणी करण्यात आली. दहशतवादी लपलेले घर बोगद्यात असल्याची माहितीही सुरक्षा दलाला प्राप्त झाली. त्यानंतर व्यापक मोहीम हाती घेत चकमक फत्ते करण्यात आली. घटनास्थळावरून शस्त्रे आणि दारूगोळाही जप्त करण्यात आला आहे. जहूर वानीच्या घरापासून हा बोगदा सुमारे 500 मीटर अंतरावर होता. एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले असले तरी त्याचे अन्य साथीदार दबा धरून बसण्याची शक्यता लक्षात घेऊन परिसरात विशेष शोधमोहीम हाती घेण्यात आली होती. रविवारी सायंकाळी उशिरापर्यंत ही मोहीम सुरू होती. तसेच या भागातील सुरक्षा बंदोबस्तही वाढविण्यात आला होता.