गृहराज्यमंत्री शंभुराज देसाईंची शहर पोलीस स्टेशनला अचानक भेट
प्रतिनिधी/ सातारा
गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी शासकीय लवाजमा बाजूला ठेवत दुचाकीवरुन फेरफटका मारत सातारा शहर पोलीस ठाण्यात सोमवारी 12 वाजता अचानक भेट दिली. शहर पोलीस ठाण्यात गृहराज्यमंत्री आणि गैरहजर पोलीस कर्मचारी, अधिकाऱयांची चांगलीच झाडाझडती घेतली. या भेटीदरम्यान उपस्थित अधिकारी, कर्मचाऱयांकडून त्यांनी विविध विषय, गुन्हे यांची माहिती घेत कामचुकार अधिकाऱयांबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. याचवेळी त्यांनी नगरसेवक बाळू खंदारे याच्यावर दाखल असणाऱया गुह्याच्या तपासातील ढिलाईबाबत तपास अधिकारी श्री सुंदर यांना फैलावर घेत चांगले काम करा, अन्यथा तुमची चौकशी करण्यात येईल असे ठणकावून सांगितले.
गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराज देसाई यांच्या एन्ट्रीने पोलीस ठाण्यात एकाच वादळ उठले. पोलीस ठाण्याच्या प्रत्येक केबीनमध्ये जात त्यांनी पोलीस कर्मचाऱयांची झाडाझडती घेण्यास सुरूवात केली. यावेळी एका मुलीला फुस लावून पळवून नेल्याने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कोण आहे, काय घडलं, अशी थेट विचारणा केली. यावेळी मुलीला फुस लावून पळवून नेल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मुलगी अल्पवयीन आहे असे पोलिसांकडून सांगण्यात आले. अशी माहिती गृहमंत्र्यांना मिळताच तिचे आधारकार्ड बघितले का? बघितले तर मला दाखवा. असे म्हणताच संबंधित पोलीस कर्मचाऱयाला नक्की काय उत्तर देऊ हा प्रश्नच पडला.
शहर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱयांच्या डोक्यावर शासकीय टोपी नसल्याचे दिसून आले. यामुळे संतापलेल्या श्री. देसाई यांनी वर्दीवर टोपी घालत जा, लाज वाटते का, का स्वतःला हिरो समजता, अशा शब्दात पोलीस कर्मचाऱयांचे कान उपटले.
यानंतर त्यांनी बीट अंमलदार यांच्या खुर्चीत ठाण मांडले. गेल्या पंधरा दिवसांत घडलेले गुन्हे आणि त्यातील गुन्हेगारांवर काय कारवाई केली, याबाबत विचारणा केली. यांची माहिती घेत असतानाच त्यांनी पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी यांना पोलीस ठाण्यात आल्याचे मेसेज वायरलेसवरुन देण्यास सांगितले. जिल्हा बँक निवडणुकीचे अर्ज भरण्याच्या प्रक्रियेसाठीच्या बंदोबस्तात वरिष्ठ अधिकारी गुंतल्याने त्यांनी उपस्थित असणाऱयांकडून माहिती घेतली.
गेले काही दिवस शहर पोलिसांच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये चुकीच्या चर्चा सुरु असल्याने मला हे करावे लागत असल्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्याकडून सांगण्यात आले. चुकीचे काम करणाऱयांवर मला खात्यांतर्गत कारवाई करावी लागेल, अशी तंबीही त्यांनी यावेळी दिली. एकंदरच शंभूराज देसाई यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे पोलीस दल हादरले असून त्यांना आपला चेहरामोहरा उजवळण्यासाठी ठोस भूमिका घेणे आवश्यक आहे.