प्रतिधिनी / वारणानगर
वाठार बोरपाडळे राज्य मार्गावर कोडोली (ता. पन्हाळा) येथील विराज गॅस एजन्सी जवळ पिंजराने भरलेल्या ट्रॅक्टरवरील चालकाचा ताबा सुटल्याने दुकानाच्या कंपाऊडमध्ये ट्रॅक्टर घुसला. यामध्ये रामचंद्र दगडू कापरे (वय ४०) रा.काखे (ता. पन्हाळा) हा गंभीर जखमी झाला. आज शुक्रवार दि. १ रोजी रात्री आठच्या सुमारास ही दुर्घटना घडली. यातील एक घटनास्थळावरून पळून गेला
आहे.
याबाबतची घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, राज्य महामार्गावर कोडोली येथील विराज गॅस एजन्सी जवळ पिंजराने भरलेला ट्रॅक्टर हा काखे (ता. पन्हाळा) कडे भरधाव वेगाने जात होता. टॅक्टरवरील चालकाचा ताबा सुटल्याने विराज गॅस एजन्सी जवळ असलेल्या महादेव ट्रेडर्स या खडी, वाळू विक्रीच्या दुकानाच्या तारेचे कंपाऊड तोडून हा ट्रॅक्टर आत गेला. यावेळी ट्रॅक्टरमध्ये दोघेजण बसलेले होते. यातील कापरे हे डांबरी रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्यास जोरदार मार लागल्याने त्यांच्या डोक्यातून व नाकातून रक्तस्त्राव होत होता. नागरिकांनी तातडीने त्यांना कोडोली उपजिल्हा रुग्णालयात हलवले. दुखापत गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांस कोल्हापूर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर एक जण घाबरून पळून गेला आहे.