प्रतिनिधी / बेळगाव
सध्या सर्वत्र कोरोनाचे सावट असल्याने प्रत्येकजण आपल्या आरोग्यावर भर देत आहे. त्यामुळेच आहारात चिकन-अंडी यांचा समावेश सर्रास केला जात आहे. यामुळेच मागील 15 दिवसांमध्ये चिकन व अंडी यांची मागणी कमालीची वाढली आहे. मागणीच्या प्रमाणात उत्पादन नसल्याने चिकन व अंडय़ांचे दर वधारले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना उपलब्ध होईल, असा मांसाहारही आता महागला आहे.
बाहेरील राज्यांमधून चिकन व अंडय़ांची मागणी कमी झाल्याने पोल्ट्री चालकांनी उत्पादन कमी केले आहे. पक्षी देणाऱया कंपन्यांनीही पोल्ट्री चालक अत्यंत कमी प्रमाणात पक्षी देत आहेत. यामुळे उत्पादन बऱयाच प्रमाणात कमी झाले आहे. याचा परिणाम बेळगाव परिसरात होणाऱया चिकन व अंडय़ांच्या विक्रीवर होत आहे.
चिकन व अंडी दरात वाढ
मध्यंतरी चिकनचा दर प्रति किलो 130 ते 140 रुपयांपर्यंत खाली आला होता. परंतु मंगळवारी बेळगाव शहरात प्रति किलो 200 रुपयांनी चिकनची विक्री केली जात होती. मागणीत वाढ झाल्याने दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी 400 रुपये शेकडा असणारी अंडी आता मात्र 610 रुपयांनी विक्री केली जात आहेत. यामुळे किरकोळ बाजारात 7 रुपये दराने अंडय़ांची विक्री केली जात आहे.
अंडय़ांची आवक मंदावली
बेळगावला सर्वाधिक अंडी ही कोप्पळ परिसरातून येतात. त्याच सोबत बागलकोट, कित्तूर येथूनही होलसेल व्यापारी अंडी खरेदी करतात. परंतु अंडय़ांची मागणी सर्वत्रच वाढल्याने अंडय़ांची आवक मंदावली आहे. कित्तूर परिसरात तर अंडीच उपलब्ध होत नसल्याचे व्यापाऱयांनी सांगितले. अंडी महागल्याने झटपट तयार होणारा अंडय़ांचा नाष्टाही काहीसा महागणार आहे.
पूर्वीचे दर | आताचे दर | |
चिकन (प्रति किलो) | 130-140 | 190-200 |
अंडी (प्रति शेकडा) | 400 | 610 |