एका इमारतीवरून दुसऱया इमारतीवर उडय़ा मारण्याचे स्टंट करण्यात तरबेज
प्रतिनिधी / बेळगाव
एखाद्या नायकाच्या मागे धावत असलेले खलनायक आणि त्यानंतरची झटापट तुम्ही चित्रपटांतून पाहिली असाल. मोठय़ा इमारतींवरून रोमहर्षक उडय़ा मारणे, त्यावर भराभरा चढणे असे प्रसंग विशेषतः तरुणाईला अधिक आकर्षित करतात. अनेक जण असे करण्याचा प्रयत्न करून हात-पायही मोडून घेतात. परंतु लहानपणी बेडूक उडय़ा मारतामारता ते एका इमारतीवरून दुसऱया इमारतीवर उडय़ा मारण्याचा यशस्वी प्रयत्न खानापूरचा सिद्धार्थ गावडे सरसपणे करतो.
खानापूरच्या शिवाजीनगर येथे राहणारा सिद्धार्थ मराठा मंडळ कॉलेजमध्ये कॉमर्स विभागात तिसऱया वर्षाला आहे. त्याच्या अनोख्या कलेमुळे सध्या तो चर्चेत आहे. सरसपणे इमारतींवर चढत-उतरत असल्याने त्याला पाहणाऱयांच्या भुवया उंचावत आहेत. इमारतीवरून तब्बल 18 फुटांवरून सहज उडी मारत आहे. या खेळाला ‘पार्कोअर’ असे देखील म्हणण्यात येते. त्यामध्ये तो पारंगत झाला आहे.
प्रारंभी इंंग्रजी चित्रपटांमध्ये हा खेळ पाहण्यास मिळत होता. परंतु त्यानंतर हिंदी, कन्नड, तामिळ, मल्ल्याळम चित्रपटांमध्ये हा प्रकार हिट ठरला. ‘एक था टायगर’ या चित्रपटामध्ये अभिनेता सलमान खान, बॅंग बँग या चित्रपटामध्ये हृतिक रोशन याने पार्कोअरचा वापर केला आहे. अभिनेते डमी कलाकार किंवा स्टंटमॅन घेऊन स्टंट करत असतात. परंतु सिद्धार्थ खरेखुरे स्टंट करत असल्याने तो एक चर्चेचा विषय ठरला आहे.
लांब उडीमुळे पार्कोअरकडे
शालेय वयापासून क्रीडा स्पर्धांकडे जास्त लक्ष असायचे. 2018 मध्ये जिल्हास्तरीय स्पर्धेत लांब उडीमध्ये जिल्हय़ात प्रथम आलो. या लांब उडीमुळे मनात एक आत्मविश्वास मिळाला. त्यातूनच पार्कोअर या खेळाकडे वळलो. इमारतींवर चढणे, उतरणे यांचा सराव करत गेला. इमारतीवरून उडी मारताना शरीराचे नियंत्रण याकडे विशेष लक्ष द्यावे लागत होते. अन्यथा अपघात होण्याची शक्मयता असते, असे तो सांगतो.
युटय़ुबमुळे मिळाली माहिती
चित्रपटात इमारतींवर चढतानाचे प्रसंग पाहिले होते. परंतु याविषयीची विस्तृत माहिती युटय़ुबवर मिळाली. या खेळाला ‘पार्कोअर’ म्हणतात याची माहिती तिथेच मिळाली. जगभरात हा खेळ कशा पद्धतीने खेळला जातो, याविषयी माहिती मिळाली. उडय़ा मारताना घ्यावयाची खबरदारी, दक्षता याची माहिती युटय़ुबवर मिळाली. प्रयत्न करत गेल्याने, तसेच युटय़ुबवरील माहिती संकलित करत गेल्याने याविषयीची सविस्तर माहिती मिळाली.
सैन्यात सेवा करण्याची इच्छा

लहानपणापासून सैन्यात जाण्याची मनात इच्छा आहे. हे स्वप्न उराशी बाळगून शिक्षण घेत होतो. घरची बेताचीच परिस्थिती असल्याने सरकारी नोकरीत जावून कुटुंबीयांसाठी काहीतरी करण्याचा विचार आहे. आई कपडे शिवून संसार चालविते तर बहिणीचे आता शिक्षण पूर्ण झाले आहे. घरातील कोणीच सैन्यात नसल्याने आपण प्रयत्न करावेत, या हेतूने सराव सुरू केला आहे. दररोज सकाळ-संध्याकाळ सरावासाठी वेळ देत असल्याचे त्याने सांगितले.