प्रतिनिधी/ चिपळूण
आपद्ग्रस्तांना मदत करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. पूर आल्यापासून तब्बल 16 हजार नागरिकांची भूक व तहान भागवण्याचे काम प्रशासन करीत आहे. 14 टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू आहे. शहरासह खेर्डी परिसरातील स्वच्छतसाठी मोठी यंत्रणा लावण्यात आली आहे. फवारणीला सुरूवात करण्यात आली असून पंचनाम्यांसाठी 45 पथके तैनात करण्यात आली आहेत. आतापर्यंत 6 हजार 100 पंचनामे पूर्ण झाले आहेत.
काही दिवसांपूर्वी शहरात महापूर आला. यामुळे शहरासह खेर्डी, कळंबस्ते, वालोपे, मजरेकाशी, मिरजोळी आदी भागात मोठे नुकसान झाले. प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न करून या महापुरात अडकलेल्या 505 नागरिकांना बाहेर काढले. त्यातील 178 जणांना तातडीने वैद्यकीय सेवा देण्यात आली. 1 हजार 800 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. पुरात 5 जण वाहून गेले असून दरड कोसळल्याने पेढे येथील तिघांचा अशा 8 जणांचा मृत्यू झाला.

आपद्ग्रस्तांना जेवण मिळावे, यासाठी माटे सभागृहात कॅन्टीन सुरू करण्यात आले आहे. येथून दरदिवशी 16 हजार जणांचा नाष्टा, जेवण पुरवले जात आहे. दीड लाख पाणी बाटल्यांचे वाटप करण्यात आले असून ते सुरूच आहे. 14 टँकरनी आंघोळ, कपडे धुण्यासह दुकानांची साफसफाई करण्यासाठी पाणीपुरवठा केला जात आहे. शहरात रोगराई पसरू नये म्हणून फवारणीला सुरूवात करण्यात आली असून यासाठी 4 टॅक्टर व अन्य वाहने यासाठी कार्यरत आहेत.
शहरासह खेर्डी परिसरातील साफसफाईसाठी जेसीबी, डंपर, टॅक्टर अशी 60 वाहने वापरात आहेत. ग्रामीण भागात 15 वाहनांच्या माध्यमातून हे काम केले जात आहे. एनडीआरएफचे 90, नेव्हीचे 36, एअरफोर्सचे 12, कोस्टगार्डचे 14, बजाव पथकाचे 12 जवान मदतकार्यात गुंतले असून स्वयंसेवी संस्था, मच्छीमार असे 100जण त्यांना मदत करत आहेत. मृत जनावरांची विल्हेवाट लावण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱयांसह 6 जणांचे पथक तैनात असून त्यासाठी 2 वाहने आहेत. आतापर्यंत 42 जनावरांची विल्हेवाट लावण्यात आली आहे.
आपद्ग्रस्तांसह मदत करणाऱयांना आवाहन
आपद्ग्रस्तांसाठी पाटीदार भवन, बहादूरशेखनाका साई अपार्टमेंट, वालोपे ग्रामपंचायत, नॅशनल इंग्लिश मिडियम स्कूल मिरजोळी, प्रांत, तहसील कार्यालय येथे मदत व संकलन केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. आपद्ग्रस्तांसह मदत करणाऱयांनी येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
..