प्रतिनिधी/ चिपळूण
वाशिष्ठी नदीतील गाळ उपसा करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात यंत्रसामुग्री दाखल झाली असून अजूनही काही प्रमाणात येत आहे. गाळ उपसा सुरू झाला असून शासनासमोर ठेवण्यात आलेल्या बहुतांशी मागण्याही पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे गेल्या 27 दिवसांपासून येथील प्रांत कार्यालयासमोर सुरू असलेले उपोषण आता मागे घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. या संदर्भात 2 जानेवारी रोजी सकाळी सकाळी 11 वाजता चिपळूण बचाव समिती पत्रकार परिषद घेऊन पुढील दिशा स्पष्ट करणार आहे.
वाशिष्ठीसह उपनद्यातील गाळउपसा करण्यासाठी येथील चिपळूण बचाव समितीच्या माध्यमातून चिपळूण परिसरातील नागरिक 6 डिसेंबरपासून येथील प्रांत कार्यालयासमोर साखळी उपोषणाला बसले आहेत. या दरम्यान स्थानिक तसेच मंत्रालय पातळीवरही उच्चस्तरीय बैठका घेण्यात आल्या. हिवाळी अधिवेशनातही चिपळूणची पूर समस्या व गाळउपसावर चर्चा झाली. त्यातून आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्यातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जलसंपदाचे मुख्य अभियंता विजय घोगरे यांची येथील गाळउपसा मोहिमेसाठी विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती केल्यानंतर गाळउपसाला खऱया अर्थाने गती आली. राज्यभरातील जलसंपदाची यंत्रसामुग्री येथे मागवून नदीतील गाळउपसा सुरू झाला. समितीने शासनाकडे एकूण 11 मागण्या केल्या आहेत. यापैकी काही प्रमाणात मान्य केल्या आहेत. उर्वरित यंत्रसामुग्री येत्या 2 दिवसांत येणार असल्याचे विनंतीपत्र जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता घोगरे यांनी उपोषणकर्त्यांना शुक्रवारी दिल्यानंतर शनिवारी सायंकाळी समितीच्या कोअर कमिटीची बैठक झाली.
नाम फाऊंडेशनची यंत्रणा दोन दिवसात
गाळ काढण्यासाठी नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून यंत्रसामुग्री येत्या 2 दिवसात उपलब्ध होणार आहे. एकूण 5 पोकलॅन्ड आणि 25 टिपरची मागणी प्रशासनाने केलेली असून त्यासाठी इंधन पुरवठाही केला जाणार आहे. त्यामुळे ही यंत्रणा येथे दाखल झाल्यानंतर गाळउपशाला आणखी गती येणार आहे.
महामार्ग ठेकेदार कंपनीलाही पत्र
राष्ट्रीय महामार्गाच्या ठेकेदारांनादेखील गाळ काढण्यासाठी पत्र देण्यात आले असून महसूल विभागाच्या परवानगीने 2 ठेकेदारांकडून 4 पोकलॅन्ड, 10 डंपरद्वारे बहाद्दूरशेख नाका, पिंपळी ते पोफळी नदीपात्रातील गाळ काढला जाणार आहे.
आज पत्रकार परिषद
चिपळूण बचाव समितीने या संदर्भात रविवारी पत्रकार परिषद बोलावली आहे. यामध्ये उपोषण आणि त्या संदर्भात प्रशासनाकडून केलेल्या कार्यवाहीबाबतची माहिती दिली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी सायंकाळी कोअर कमिटीची बैठकही झाली. बैठकीत झालेल्या निर्णयाची माहितीही दिली जाणार आहे. शक्यतो यावेळी उपोषणाची पुढील दिशा अथवा स्थगिती या बाबत जाहीरपणे आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे वृत्त आहे.