प्रतिनिधी/ बेळगाव
चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रीजची निवडणूक सोमवारी पार पडली. औद्योगिक क्षेत्रासाठी उद्यमबाग येथील चेंबर ऑफ कॉमर्सचे कार्यालय तर व्यापारी क्षेत्रासाठी न्यू गुड्सशेड रोड येथील नर्तकी स्क्वेअर अपार्टमेंट येथे मतदान पार पडले. दोन्ही क्षेत्रांच्या एकूण 8 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात होते. यामध्ये चेंबर ऑफ कॉमर्स विकास पॅनेलने बाजी मारली.
दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. औद्योगिक क्षेत्रातून रोहन जवळी यांनी 216, प्रभाकर नागरमुन्नोळी यांनी 211 तर आनंद देसाई 208 मते मिळवून विजयी ठरले. औद्योगिक गटातून हेमेंद्र पोरवाल 343, संजय पोतदार 367, राजेंद्र मुतगेकर 300, संतोष कलघटगी 300 व विक्रम जैन यांनी 275 मते घेऊन बाजी मारली.
दोन सदस्य यापूर्वीच बिनविरोध
व्यापारी गटातील सर्वसाधारण एका जागेसाठी सुधीर चौगुले व औद्योगिक गटातून सतीश कुलकर्णी यांचा प्रत्येकी एक अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 10 जागांपैकी 2 जागा बिनविरोध झाल्यामुळे 8 जागांसाठी निवडणूक घेण्यात आली.
मतदान सुरू होण्यास विलंब
मतदान प्रक्रिया सकाळी 10 ते 4 या वेळेत होणार होती. परंतु सकाळी मतदान उशिराने सुरू झाल्याने मतदानासाठी आलेल्या व्यापाऱयांमधून नाराजी व्यक्त होत होती. सकाळच्या सत्रात मतदान करण्यासाठी व्यापाऱयांनी न्यू गुड्सशेड रोड येथील कार्यालयात गर्दी केली होती. परंतु उशिराने मतदान सुरू झाल्याने काही वेळ त्यांना थांबावे लागले. यामुळे त्यांच्यातून नाराजीचा सूर उमटत होता.
बॅटरीच्या प्रकाशात कागदपत्रांची पडताळणी
मतदान केंद्राचे योग्य प्रकारे नियोजन न केल्याचा फटका व्यापाऱयांना बसला. कागदपत्रांची पडताळणी केली जात असलेल्या कक्षात पुरेसा प्रकाश नव्हता. त्यामुळे अंधारातून वाट काढत व्यापारी मतदान कक्षात जात होते. वयोवृद्ध सदस्यांना मोबाईल टॉर्चचा वापर करून कागदपत्रांची पूर्तता करावी लागत होती. यामुळे संताप व्यक्त केला जात होता.