राजकारणासह क्रीडाप्रेमी शोकसागरात : आज अंत्यसंस्कार होणार
लखनौ / वृत्तसंस्था
माजी क्रिकेटपटू आणि उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारमधील कॅबिनेट मंत्री चेतन चौहान यांचे रविवारी निधन झाले. काही दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे त्यांच्यावर गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे त्यांची प्राणज्योत मावळल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. त्यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. चौहान यांच्या पार्थिवावर सोमवारी अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती निकटवर्तीयांकडून देण्यात आली.
चेतन चौहान यांनी 1969 ते 1978 या कालावधीत क्रिकेटविश्वात यशस्वी कामगिरी बजावली होती. त्यानंतर जवळपास 13 वर्षे त्यांनी दिल्ली क्रिकेट असोशिएशनचे (डीडीसीए) उपाध्यक्षपदही सांभाळले होते. क्रिकेटबरोबरच राजकारणातही त्यांनी आपले नशीब आजमावत योगी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपदापर्यंत धडक मारली होती.
उत्तर प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून कार्यरत असलेल्या चौहान यांना जुलैमध्ये कोरोनाची लागण झाली होती. यानंतर सर्वप्रथम लखनौ येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान उच्च रक्तदाब आणि किडनीचा त्रास सुरू झाल्यानंतर त्यांना तात्काळ गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात हलवण्यात आले होते. प्रकृती बिघडल्यामुळे शुक्रवारपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
आतापर्यंत राज्यात कोरोनाने दोन मंत्र्यांचा मृत्यू
कोरोनाची लागण झाल्यामुळे योगी सरकारमधील दुसऱया कॅबिनेट मंत्र्याचे निधन झाले आहे. यापूर्वी 2 ऑगस्ट रोजी कमला राणी वरुण यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता चेतन चौहान यांनाही प्राण गमवावे लागले आहेत. चेतन चौहान यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी सायंकाळी 7 वाजता आपल्या सरकारी निवासस्थानी तातडीची बैठक आमंत्रित केली होती. चेतन चौहान हे जितके लोकप्रिय खेळाडू होते, तितकेच ते लोकप्रिय लोकनेतेही होते, अशा शब्दात योगी आदित्यनाथ यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.