सैनिक गिरगावचे सुभेदार मेजर शशिकांत साळोखे 33 वर्षांच्या लष्करी सेवेतून निवृत्त
कोल्हापूर प्रतिनिधी
देशसेवेसाठी आपले आयुष्य अर्पण करणारे सैनिक गिरगाव ता. करवीर येथील सुभेदार मेजर ऑननरी लेफ्टनंट शशिकांत आनंदा साळोखे 31 मार्च 2022 या दिवशी लष्करी सेवेतून निवृत्त झाले. 33 वर्षांच्या देशसेवेनंतर अंगावरील लष्करी पोशाख उतरविताना सुभेदार साळोखे यांनी युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले आणि घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्य़ाला सॅल्युट करून आपला कृतज्ञता भाव व्यक्त केला.
सैनिक टाकळी प्रमाणे जवानांचे गाव म्हणून प्रसिद्ध असणाऱया सैनिक गिरगावचे सुपुत्र असणाऱ्या शशिकांत साळोखे 1989 मध्ये भारतीय लष्करात शिपाईपदावर भरती झाले. पॅरंट युनिट 14 मराठा लाईट इन्फंट्रीच्या माध्यमातून देशाच्या विविध ठिकाणी सेवा बजावली. शिपाईपदापासून नायक, लान्सनाईक ते सुभेदार, मेजर, लेफ्टनंटपदापर्यंत भरारी घेतली. पोर्ट ब्लेअर-अंदमान निकोबार, सोलन-हिमाचल प्रदेश, पुंछ-जम्मू, काश्मिर, आगरतळा-त्रिपुरा, अहमदाबाद-गुजरात, बिनागुडी-प. बंगाल, बेळगाव-सेंटर, सियाचिन ग्लॅसीयर-जम्मू, कश्मिर, ग्वाल्हेर-मध्यप्रदेश, राजौरी-जम्मू, काश्मिर, एलओसी-पुंछ, रायचूर-कर्नाटक या ठिकाणी सेवा बजावत कुलाबा-मुंबईतून ते 31 मार्च 2022 रोजी निवृत्त झाले. शुक्रवारी 1 एप्रिल रोजी ते कोल्हापूरला परतले. येथील छत्रपती शिवाजी महाराज, शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज, लोकराजा राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले आणि घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शहरातील पुतळय़ांना पुष्पहार अर्पण करून त्यांना लष्करी दिमाखात सॅल्युट करून कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्यासोबत संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रूपेश पाटील, श्रीकृष्ण साळोखे, भगवान कोईगडे, निलेश सुतार, संदीप यादव, युवराज जाधव, ज्ञानेश्वर साळोखे आदी उपस्थित होते. यावेळी साळोखे यांचा संभाजी ब्रिगेडतर्फे सत्कार करण्यात आला.
निवृत्तीनंतर समाजकार्य आणि मार्गदर्शन करणार
लष्करी सेवेतील निवृत्तीनंतर समाजकार्यात सहभागी होणार असून लष्करात जाऊ इच्छिणाऱया मुलांना मार्गदर्शन करणार असल्याचे सुभेदार शशिकांत साळोखे यांनी सांगितले. कोरोनाच्या काळात गिरगावात कोविड सेंटर उभे करण्यासाठी गावकरऱयांना साळोखेंनी सहकार्य केले होते.