शाहुवाडी / प्रतिनिधी
कर्नाटक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी मलकापूर येथे कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर शाहुवाडी तालुका शिवसेनेच्या वतीने त्या घटनेचा निषेध व्यक्त करून विटंबना करणाऱ्याच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. शिवसेना तालुकाप्रमुख दत्ता पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
कर्नाटक येथे रयतेचे जाणते राजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केली आहे. या प्रकरणी संपूर्ण महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली आहे. असे कृत्य करणार्यांच्या विरोधात सर्वत्र संतप्त भावना निर्माण होऊ लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर मलकापूर येथे विठ्ठल मंदिराच्या पाठीमागे कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर शाहुवाडी तालुका शिवसेनेच्यावतीने आंदोलन करून या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. अशा घटना करणाऱ्यांना कडक शासन होण गरजेचे असून अशी कृत्ती यापुढे होणार नाही व अशी परिस्थिती निर्माण झाल्यास त्यांना त्यांची जागा दाखवून दिली जाईल, त्याचबरोबर तेथील राज्यकर्त्यांनी केलेले वक्तव्यही निषेधार्ह असल्याचे मनोगत यावेळी माजी सभापती विजय खोत, तालुकाप्रमुख दत्ता पवार, दिनकर लोहार यांनी व्यक्त केले.
या आंदोलनात माजी सभापती विजय खोत, नगरसेविका संगीता कुंभार, माया पाटील, मलकापूर शहर शिवसेनाप्रमुख बाबुराव चांदणे, माजी नगरसेवक विनायक कुंभार, माजी नगराध्यक्ष राजू भोपळे, नगरसेवक सुभाष कोळेकर, राहुल पवार, धोंडीराम सोने, प्रकाश चौगुले, बाबुराव सोनवळे, महिला आघाडीच्या अलका भालेकर, पूनम भोसले, आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनस्थळी पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाहूवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.