वन्यजीव विभागाच्यावतीने राधानगरी जंगल बस सफारी उपक्रमाचे उद्घाटन
प्रतिनिधी/कोल्हापूर
वन्यजीव विभागाने सुरु केलेल्या ‘जंगल बस सफारी’ उपक्रमामुळे राधानगरी अभयारण्यातील पर्यटनाला चालना मिळेल, असे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. राधानगरी, दाजीपूर जंगल सफारीच्या उद्देशाने वन्यप्राण्यांच्या चित्रांनी सजवलेल्या जंगल सफारी बसचे उद्घाटन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. रमणमळा येथील `वन विश्रामगृह’ येथे आयोजित या कार्यक्रमाला खासदार प्रा. संजय मंडलिक, कोल्हापूर प्रादेशिक विभागाचे मुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेन, सह्याद्री व्याघ्र राखीव विभागाचे वनसंरक्षक, क्षेत्र संचालक समाधान चव्हाण, विभागीय वन अधिकारी विशाल माळा यांची प्रमुख उपस्थिती होती.
ट्रक रूट, सायकल रूट करण्याच्या सुचना
पालकमंत्री पाटील म्हणाले, कोल्हापुरातून निघणाऱया या `जंगल सफारी बस’मुळे देश विदेशातून राधानगरी परिसराच्या पर्यटनासाठी येणाऱया पर्यटकांची सोय होईल. त्यांना अभयारण्यातील जैवविविधता व पशुपक्षी पाहण्याची संधी मिळेल. जंगलामध्ये पर्यटनाच्या हेतूने नवीन ट्रक रुट व सायकल रुट सुरु करावेत, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.
खासदार मंडलिक म्हणाले, राधानगरी अभयारण्य हे जागतिक वारसा स्थळ आहे. येथील पर्यटनाला चालना मिळण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या पुढाकाराने जिल्हा वार्षिक योजना आराखडÎात बसची तरतूद केली होती. यातून कोल्हापूर वन्यजीव विभागास 30 सीटर बस घेण्यात आली आहे. ही बस सप्ताहातून सहा दिवस बुधवार ते सोमवारी (मंगळवारी सुट्टी) रोज सकाळी 7 वाजता वन विश्रामगृह, ताराबाई पार्क येथून राधानगरी, दाजीपूर पर्यटनासाठी निघेल. एका पर्यटकाला नाममात्र 300 रुपये शुल्क आहे. यामध्ये चहा, नाश्त्यासह दिवसभर जंगल सफारीचा आनंद लुटता येणार असल्याचे सांगितले.
बसच्या बुकिंगसाठी विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) कार्यालय, सिमंतिनी अपार्टमेंट, रमणमळा, 0231- 2669730 येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन राधानगरीचे वनाधिकारी विशाल माळी यांनी केले. कार्यक्रमाला अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
बालकल्याण संकुलातील 15 मुलांनी घेतला लाभ
मुख्य वनसंरक्षक चव्हाण म्हणाले, राधानगरी अभयारण्यात हत्तीमहाल, फुलपाखरु उद्यान, रौतवादी धबधबा, माळवाडी बोटिंग व दाजीपूर गवा सफारी या सर्व ठिकाणांना या बस सफारीद्वारे भेट देता येणार आहे. आठवडÎातून एक दिवस या बसमधून शासनातर्फे अनाथ, दिव्यांग, विद्यार्थ्यांना मोफत जंगल सफारी करता येणार आहे. पहिल्या बस सफारीतून बालकल्याण संकुल येथील 15 अनाथ मुलांना मोफत जंगल सफारीचा लाभ देण्यात आला आहे.