जर्मनीत मिळाला हरिणीच्या खुराने तयार दागिना
जर्मनीत जगातील सर्वात जुना दागिना शोधण्यात आला आहे. हरिणीच्या खुराने हा दागिना तयार करण्यात आला असून तो सुमारे 51 हजार वर्षांपूर्वीचा आहे. याचा वापर सुमारे 40 हजार वर्षांपूर्वी विलुप्त झालेली प्रजाती ‘निएंडरथल’ करत होती असा दावा संशोधकांचा आहे. जर्मनीच्या हनोवर येथील स्टेट सर्व्हिस फॉर कल्चरल हेरिटेजच्या टीमनुसार निएंडरथल प्रजाती देखील सुंदर दिसण्याचा प्रयत्न करत होती.

हा दागिना जर्मनीच्या हार्ज डोंगरांच्या पायथ्याशी असलेल्या यूनिकॉर्न गुहेत सापडला आहे. त्या काळात दागिना तयार करण्यासाठी हाडांचा वापर व्हायचा. प्राप्त दागिना आताच्या तुलनेत खूपच मोठा आहे. दागिना तयार करण्यापूर्वी हाडांचा टणकपणा दूर केला जायचा, याकरता गरम पाण्यात हाडं उकळली जात असावीत. हाडं नरम होताच त्यावर कोरीव काम केले जायचे असे संशोधक डॉक्टर डिर्क लेडर यांनी म्हटले आहे. 3डी मायक्रोस्कोपी आणि सीटी स्कॅन केल्यावर डिझाइन तयार करण्यासाठी निउंडरथलने टोकदार दगड आणि धारदार अवजारांचा वापर केल्याचे दिसून आले. ही माहिती विचारात घेतल्यास निएंडरथल प्रजाती अत्यंत विकसित होती असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. याचबरोबर त्या काळातील हरिण आकाराने अत्यंत मोठी असावी. यासंबंधीचे अध्ययन नेचर इकोलॉजी अँड इव्होल्युशन जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.