रुग्णालयांना महानगरपालिका बजावणार नोटीस : जन्म-मृत्यूची नोंद ऑनलाईनद्वारे करण्याची सूचना : खासगी रुग्णालयांना लॉगईन आयडीची सोय
प्रतिनिधी /बेळगाव
खासगी रुग्णालयात जन्म वा मृत्यू झाल्यास त्याची नोंद महापालिकेकडे करणे बंधनकारक आहे. याकरिता ऑनलाईन नोंद करण्याची सूचना महापालिकेने रुग्णालयांना केली आहे. मात्र ऑनलाईन नोंद करण्याऐवजी नागरिकांच्या हातात जन्म व मृत्यू दाखल्याची पावती देण्याचा प्रकार काही रुग्णालयांनी चालविला आहे. त्यामुळे अशा रुग्णालयांना नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
महापालिका व्याप्तीमधील जन्म-मृत्यूची नोंद महापालिकेकडे करण्यात येते. तसेच जन्म-मृत्यू दाखले वितरित केले जातात. जर सरकारी रुग्णालयात जन्म-मृत्यू झाल्यास ती नोंद सरकारी रुग्णालयात केली जाते. एक वर्षापर्यंत सरकारी रुग्णालयात जन्म-मृत्यू दाखले देण्यात येत होते. मात्र आता ‘ई-जन्म’ या ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून संगणक सेवा केंद्रावर उपलब्ध होत आहेत. मात्र प्रथमच जन्म दाखला घेण्यासाठी बाळाचे नाव नोंद करणे आवश्यक असते. त्यामुळे नाव नोंद करण्याकरिता महापालिका किंवा सरकारी रुग्णालयात अर्ज करावा लागतो. त्यानंतर जन्म दाखले दिले जातात.
नागरिकांना सोयीस्कररित्या दाखले देण्याच्यादृष्टीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. दाखले उपलब्ध करून देण्याच्यादृष्टीने खासगी रुग्णालयांतील जन्म-मृत्यूच्या नोंदी होणे आवश्यक आहे. यापूर्वी जन्म व मृत्यूची नोंद करण्यासाठी रुग्णालयांकडून महापालिकेकडे नोंद वही पाठविण्यात येत असे. पण आता ऑनलाईन नोंद करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. याकरिता खासगी रुग्णालयांना लॉगईन आयडी दिली आहे. शहर आणि उपनगरांतील बहुतांश रुग्णालयांतील जन्म-मृत्यूची नोंद ऑनलाईन करण्यात येत आहे. पण काही रुग्णालयांकडून ऑनलाईन नोंद करण्यात येत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
लवकरच बजावणार नोटीस
जन्म-मृत्यूच्या नोंदीची पावती थेट नातेवाईकांच्या हातात सोपविण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे जन्म-मृत्यू नोंदीमध्ये खाडाखोड किंवा नोंदीमध्ये दुरुस्ती करण्याचा धोका आहे. त्यामुळे जन्म-मृत्यूची नोंद ऑनलाईनद्वारे करण्याची सूचना महापालिकेकडून खासगी रुग्णालयांना केली होती. पण याकडे दुर्लक्ष केले आहे. अद्यापही नागरिकांच्या हातात जन्म दाखल्याची पावती देण्याचा प्रकार सुरू आहे. खासगी रुग्णालयांना नोटीस बजावण्याची सूचना मनपाच्या आरोग्याधिकाऱयांनी केली आहे.लवकरच नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.