रूग्णसेवेत चार ते पाच दिवसांत होईल सज्ज
प्रतिनिधी/ सातारा
जिह्यातील कोरोना बाधितांना बेडची खूप अत्यावश्यकता होती. त्यावेळी प्रशासनाकडून जम्बो हॉस्पिटलच्या टेंडरची प्रक्रिया व साधनसामुग्री जमा करण्याचे काम सुरू होते. आता घाईगडबडीने नऊ टेंडरची पूर्तता केल्यानंतर जम्बो हॉस्पिटल अंतिम टप्प्यात आले आहे. काही इक्विपमेंट जोडण्याचे बाकी असल्याने आणखी चार ते पाच दिवसांनंतर हे रूग्णालय बाधितांच्या सेवेत दाखल होईल, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगितले जात आहे.
कोरोना बाधितांच्या मृत्यूदरात देशात तिसरा तर बाधितांच्या आकडेवारीमध्ये देशात नवव्या क्रमांकावर सातारा जिह्याची नोंद झाली. या महिनाभराच्या कालावधीत सर्वाधिक त्रास झाला, तो बाधित रूग्णांना वेळेवर उपचारासाठी बेड उपलब्ध होऊ न शकल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले. तर काहींना साधा ऑक्सिजन बेडही उपलब्ध होऊ शकला नाही. परिणामी धाम लागून जीव गमावण्याची काहींवर वेळ आली. कोणत्याही रूग्णालयात संपर्क साधला तर सर्व बेड फुल्ल आहेत, असेच सांगितले जात आहे. दुसरीकडे जिल्हा प्रशासन जम्बो हॉस्पिटल उभारणीत व्यस्त हेते. त्यासाठी तब्बल नऊ प्रकारची टेंडर काढण्यात आली. या प्रक्रियेला महिना गेल्यामुळे सप्टेंबरमध्ये रूग्णांचे प्रचंड हाल झाले. आता जम्बो रूग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या तीन ते चार दिवसांत रूग्णालयाचे लोकार्पण होणार असल्याचे अधिकारी सांगत आहेत. तसेच डॅशबोर्ड ची सुविधा उपलब्ध असल्याने जिह्यातील कोणत्या रूग्णालयात बेड उपलब्ध आहेत. यांची माहिती तातडीने मिळू शकत आहे.
आता कोरोनाच्या चाचण्यांचे प्रमाण कमी केल्यामुळे विविध रूग्णालयांतही बेड उपलब्ध होऊ लागले आहेत. तेथे मात्र, रूग्णांचा खिसाच कापला जात आहे. सर्वसामान्य रूग्णांना खाजगी रूग्णालयांत उपचार परवडणारा नाही. त्यामुळे अशा रूग्णांसाठी जम्बो हॉस्पिटल मोठा आधार ठरणार आहे. आता खाजगी रूग्णालयांतही बेड उपलब्ध होऊ लागल्याने जिल्हा रूग्णालयावर पडणारा ताणही कमी झाला आहे. अशा परिस्थितीत वेळेत जम्बो हॉस्पिटलचा उपक्रम हाती घेतलाअसता तर सप्टेंबरमध्ये झालेले रूग्णांचे हाल व मृत्यूचे प्रमाण अल्प राहिले असते.