ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात तैनात असलेल्या मेजरने स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडली. पोलिसांनी मेजरचा मृतदेह ताब्यात घेतला असून, तो कार्यवाहीसाठी पाठविण्यात आला आहे.
मिळालेल्या वृत्तानुसार, मेजर परमिंदर सिंग मूळचे नवी दिल्लीचे रहिवाशी होते. सध्या ते जम्मू-काश्मीरच्या रामबनमधील माहूबाल भागात कतर्व्यावर होते. शनिवारी रात्री त्यांनी आपल्या क्वार्टरमध्ये स्वत:वर एके 47 रायफलने गोळ्या झाडल्या. बंदुकीचा आवाज ऐकून क्वार्टरमधील जवान घटनास्थळी दाखल आले. तेव्हा मेजर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, तो पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आला आहे. दरम्यान आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.