- सीआरपीएफचे 3 जवान जखमी; 1 शहीद
ऑनलाईन टीम / जम्मू :
जम्मू काश्मीरच्या सुरक्षा दलावर गुरुवारी पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला. श्रीनगरच्या हद्दीतील लारापोआमध्ये दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या पेट्रोलिंग पार्टीवर हा हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफचे 4 जवान जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान, एक जवान शहीद झाला आहे. हल्ला झालेल्या परिसरात सुरक्षा दलाने घेराव घातला असून शोध मोहीम सुरू केली आहे. या हल्ल्यात कोणतीही नागरी हानी झालेली नाही.

सीआरपीएफचे पीआरओ ओ. पी. तिवारी यांनी सांगितले की, पेट्रोलिंग पार्टीवर तैनात असलेल्या 73 व्या बटालियनवर दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केला. यामध्ये 4 जवान जखमी झाले होते त्यातील एक जवान शहीद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांची संख्या तीन सांगितली जात आहे. त्यांनी गोळीबार केला आणि लगेचच पळ काढला. हा भाग गर्दीचा असल्याने यावेळी सुरक्षा दलाने संयम दाखवला नाहीतर दहशतवाद्यांनी येथील स्थानिक लोकांना नुकसान पोहोचवले असते.
दरम्यान, या ठिकाणची सर्व दुकाने, मार्केट बंद करण्यात आले आहेत. तसेच ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. हे अतिरेकी कोणत्या दहशतवादी संघटनेचे होते याची माहिती अद्याप मिळाली नसून सुरक्षा दलाचे जवान त्याचाही शोध घेत आहेत.