ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
देशाची राजधानी दिल्ली लगत असणाऱ्या गाझियाबाद जिल्ह्यात ५ जून रोजी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही तरुण एका वृद्ध मुस्लीम व्यक्तीला बेदम मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही वृद्ध मुस्लीम व्यक्ती मारहाण थांबवण्यासाठी तरुणांना हात जोडत असल्याचे दिसत आहे. या प्रकारानंतर पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.
पीडित व्यक्ती अब्दुल समद सैफी बुलंदशहर येथील रहिवासी असून लोणी येथे जात असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. आपल्या धर्मामुळेच लक्ष्य केले असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच या तरुणांनी आपल्याला श्री राम बोलण्यासाठी मारहाण करत आपली दाडी कापली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. व्हिडीओमधील मारहाण करणाऱ्या एका आरोपीची ओळख पटली असून प्रवेश गुर्जर असे त्याचे नाव आहे. तो गाझियाबाद येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले आहे.