ऑनलाईन टीम / बर्लिन :
कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येचा विचार करता जर्मनीत 16 डिसेंबरपासून पुन्हा लॉकडाऊन करण्यात येणार आहे. जर्मनीच्या चॅन्सेलर अँगेला मर्केल यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.
जर्मनीत कोरोना रुग्णांचे आणि मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, यासाठी मर्केल यांनी देशातील 16 राज्यांच्या प्रमुखांसोबत एक बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला.
जर्मनीत 16 डिसेंबर 2020 ते 10 जानेवारी 2021 पर्यंत 25 दिवसांचा लॉकडाऊन असेल. या काळात अत्यावश्यक वस्तूंची दुकाने, अत्यावश्यक सेवा आणि बँका सुरू असतील.
जर्मनीत 13 लाख 20 हजार 592 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 9 लाख 57 हजार 500 रुग्ण बरे झाले असून, 3 लाख 40 हजार 921 रुग्ण उपचार घेत आहेत. तर 22 हजार 171 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.