गोव्यात पुढील आठवडय़ात सोहळय़ाचे आयोजन शक्य, संजना गणेशन वाग्दत्त वधू असण्याची चर्चा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय क्रिकेट संघातील स्टार जलद गोलंदाज जसप्रित बुमराह लवकरच विवाहबेडीत अडकणार असल्याचे संकेत आहेत. संजना गणेशन या क्रिकेट प्रेझेंटरशी तो विवाहबद्ध होईल आणि हा सोहळा साधारणपणे आठवडाभरात गोव्यात होण्याची शक्यता ठळक चर्चेत आहे. संजना गणेशनने अनेक क्रिकेट स्पर्धांमध्ये सूत्रसंचालन केले असून स्टार स्पोर्ट्सच्या केकेआर फॅन शोमध्ये देखील तिचा समावेश होता.
संजना गणेशन सिम्बॉयोसिस इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीतील सुवर्णजेती असून ती फेमिना मिस इंडिया पुणे स्पर्धेतील फायनलिस्ट देखील राहिली आहे. 2016 पासून ती कोलकाता नाईट रायडर्स संघाशी संलग्न राहिली असून नाईट क्लब या शोचे सूत्रसंचालन तिने केले आहे.

भारतीय संघ सध्या इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत खेळत असून बुमराहने चौथ्या कसोटी सामन्यात आपला निवडीसाठी विचार करु नये, अशी विनंती बीसीसीआयकडे केली होती. वैयक्तिक कारणास्तव बुमराह येथे खेळणार नाही, असे बीसीसीआयने त्यावेळी जाहीर केले. मात्र, आता बुमराहच्या निकटवर्तियांनी दिलेल्या माहितीनुसार, तो लवकरच विवाहबद्ध होणार असून या सोहळय़ाच्या तयारीसाठीच त्याने बीसीसीआयकडून सुटी मंजूर करवून घेतली आहे.
जसप्रित बुमराह व 25 वर्षीय तेलगू अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन विवाह करतील, अशी चर्चा गतवर्षी रंगली होती. पण, त्यावेळी स्वतः अनुपमाने याचा इन्कार केला होता. बुमराह फक्त क्रिकेटपटू आहे, इतकेच मला माहीत आहे. यापेक्षा आणखी काहीही नाही, असे ती त्यावेळी म्हणाली होती. मद्रास कॅफेसारख्या काही हिंदी चित्रपटात भूमिका साकारणारी आणखी एक तेलगू अभिनेत्री राशी खन्ना हिच्याशी देखील बुमराहचे नाव जोडले गेले होते. पण, तिनेही या चर्चेत काहीही तथ्य नसल्याचे त्यावेळी स्पष्ट केले होते.
27 वर्षीय बुमराह अलीकडील काही वर्षात भारताचा आघाडीचा जलद गोलंदाज म्हणून नावारुपास आला आहे. 2019 मध्ये गंभीर पाठदुखीमुळे शस्त्रक्रिया करवून घेतल्यानंतर तो काही काळ क्रिकेट खेळू शकला नव्हता. कोव्हिड लॉकडाऊनमुळे क्रिकेट ठप्प होण्यापूर्वी जानेवारी 2020 मध्ये त्याने भारतीय संघात पुनरागमन केले होते. बुमराहने मागील 5 महिन्यांच्या कालावधीत व्यावसायिक क्रिकेटमध्ये 277.1 षटके गोलंदाजी केली आहे.