- योग सादर करणारा ठरला जगातील पहिला पपेट
- ठाकर आदिवासी कलाग्राम, पिंगुळीची निर्मिती
शेखर सामंत / सिंधुदुर्ग:
जागतिक योगदिनाचे औचित्य साधत योग प्रचार आणि प्रसारात पपेट कलेचाही सहभाग राहावा, या उद्देशाने पपेटच्या माध्यमातून योगसाधना जगासमोर आणण्याचा पहिला यशस्वी प्रयत्न कुडाळनजीकच्या ‘ठाकरवाडी आदिवासी कलाग्राम, पिंगुळी’ यांनी सोमवारी केला. अशा पद्धतीने पपेटरीच्या दुनियेत योग प्रदर्शन करणारे हे जगातील पहिले पपेट ठरले आहे. ठाकरवाडी कलाग्रामचे प्रमुख सदस्य असलेले बाळकृष्ण गणपत मसगे आणि शिवदास मसगे या बंधूंनी हे पपेट बनवलं आहे.
जागतिक पहिली पपेट कला म्हणून ओळखल्या जाणाऱया ठाकर आदिवासी पपेटरीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. ही प्राचीन पपेटरी फक्त आता सिंधुदुर्गातील पिंगुळी-गुढीपूर येथेच पाहायला मिळते. या गुढीपूरमध्ये अलीकडेच नव्याने उभ्या राहिलेल्या ठाकरवाडी आदिवासी कलाग्राममध्ये या पपेटरीची प्राचीन ओळख कायम ठेवून, त्यास आधुनिकतेची साज चढवण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू असतो. आजच्या जागतिक योग दिनाचे औचित्य साधून या कलाग्रामच्या बाळकृष्ण आणि शिवदास या बंधूंनी योगप्रसार आणि प्रचार करणारा ‘योगीबाबा’ पपेट बनवून तो पहिल्यांदाच जगासमोर आणला.
पपेटच्या माध्यमातून जगासमोर आलेला हा योगीबाबा तब्बल दहा आसनांचे मार्गदर्शन करतो. पपेटवर प्रेम करणाऱया बच्चे कंपनीना योगाची आवड निर्माण व्हावी, लहान वयातच त्यांना योगाची ओळख व्हावी, हा या मागचा प्रमुख उद्देश असल्याचे या मसगे बंधूंनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
या पपेटबद्दल अधिक माहिती देताना ते म्हणाले, सर्वसामान्यपणे ठाकर पपेटमध्ये पपेटरीसाठी तीन धागे वापरले जातात. राक्षसाचं पात्र असेल फार-फार तर पाच धागे वापरले जातात. परंतु, या नवीन योगीबाबाच्या पपेटसाठी आम्ही चक्क 14 धागे वापरले आहेत. पारंपरिक चौकटीच्या बाहेर जाऊन अगदी वेगळय़ा पद्धतीने हे पपेट डिझाईन करण्यात आले आहे. अमेरिका, जर्मन आणि चिनी पपेटप्रमाणे हे पपेट आपली कला सादर करणार आहे. आपल्या ठाकर आदिवासी पपेटरीमध्ये पपेट सादर करणारे पडद्याआड असतात. त्यामुळे पपेटच्या हालचालींना काही मर्यादा येतात. परंतु, वरील देशांमध्ये पपेट सादर करणारे पपेटसोबतच समोर असतात. त्यामुळे त्यांना मुक्तपणे पपेटच्या हालचाली करता येतात. योग शिकवणाऱया ह्या योगीबाबा पपेटला जास्तीत जास्त मुव्हमेंट मिळाण्यात यासाठी ही विदेशी कन्सेप्ट या पपेटमध्ये वापरल्याचे त्यांनी सांगितले. ही पपेटरी सादर करताना दर्शकांचे लक्ष केवळ आणि केवळ पपेटकडे राहावे, यासाठी पपेट सादर करणाऱयाला पूर्णपणे ब्लॅक ट्रेस कोड देण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. यू टय़ूब चॅनेलवरून हा ‘पपेट योगी’ आता जगभर पोहोचणार असल्याचे ते म्हणाले. थोडक्यात सांगायचे, तर पपेटच्या माध्यमातून प्रथमच जगासमोर आलेला हा ‘योगी बाबा’ बच्चे कंपनीला योगाचा लळा लावेल हे निश्चित.