मतदान फोडाफोडीच्या राजकारणाला येणार वेग
कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरल्यापासून सुरु असलेल्या प्रचाराच्या तोफा रविवारी सायंकाळी 6 वाजता थंडावल्या. जाहीर प्रचारास पूर्णविराम मिळाला असला तरी आता छुप्या प्रचाराला वेग येणार आहे. वैयक्तीक गाठीभेटी, अंतर्गत बैठका आणि पडद्याआडच्या घडामोडींसह एसएमएस आणि सोशल मिडियाद्वारे जोरदार प्रचार सुरु राहणार आहे. सोमवारी रात्री मतदान फोडाफोडीचे राजकारण होण्याची शक्यता असल्यामुळे महाविकास आघाडी व भाजपचे नेते, उमेदवार आणि त्यांच्या कार्यकत्यांनी सावध भुमिका घेत विरोधकांच्या हालचालीवर लक्ष ठेवले आहे. मंगळवारी (12 रोजी) मतदान होत असल्यामुळे त्या दिवशी कोणी काय करायचे ? याचे नेटके नियोजनही उमेदवारांकडून सुरु आहे.
‘कोल्हापूर उत्तर’ च्या पोटनिवडणुकीमध्ये आपलाच उमेदवार निवडून यावा यासाठी महाविकास आघाडी व भाजपच्या नेत्यांनी जीवाचे रान केले आहे. बहुजन वंचित आघाडीसह निवडणूक रिंगणातील इतर उमेदवारांनीही आपली ताकद पणाला लावली आहे. गेल्या आठवडय़ाभरात राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा झाल्यामुळे कोल्हापूर बरोबरच राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींमध्ये विकासकामांचा मुद्दा गौण ठरला. महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव व भाजपचे सत्यजित कदम यांच्यामध्ये काटाजोड लढत होत असली तरी पालकमंत्री सतेज पाटील व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यामध्येच सामना रंगल्याचे पहावयास मिळाले. रविवारी जाहीर प्रचाराचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे पदयात्रा, रोडशो, प्रत्यक्ष गाठीभेटी, कोपरा सभांनी रविवारचा दिवस गाजला. मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्व उमेदवारांकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले.