मुंबई / ऑनलाईन टीम
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून ‘म्हाडा’ने आपले 100 प्लॅट्स टाटा कॅन्सर हॉस्पिटलला देण्याचा निर्णय घेतला आहे. तशी घोषणाच आज जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज टाटा रुग्णालयाचे आणि म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबत एक पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी टाटा रुग्णालयापासून 5 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या हाजीकासम चाळ परिसरातील म्हाडाचे 100 फ्लॅट्स टाटा रुग्णालयाला देत असल्याचं आव्हाड यांनी जाहीर केलं. आव्हाड यांनी ही संकल्पना काही दिवसांपूर्वी बोलून दाखवली होती. त्यानंतर आज हा निर्णय झाल्याचं त्यांनी सांगितलं.

जितेंद्र आव्हाड यावेळी माध्यमांशी बोलतान म्हणाले की, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे व असं अनेकदा दिसून येतं की बरेच रूग्ण किंवा रूग्णांच्या नातेवाईकांना मुंबईतील रस्त्यांवर पडून रहावं लागतं. हे दृश्य पाहून अत्यंत वाईट वाटतं. म्हणून आम्ही मानवतेच्यादृष्टीने असा विचार केला की, आमच्याकडे जेवढे काही फ्लॅट्स आहेत, ते आम्ही आज 100 व आगामी काळात ते वाढवून 200 करणार आहोत आणि ते फ्लॅट्स आम्ही टाटा कॅन्सर हॉस्पिटलकडे सोपवणार आहोत. त्यानंतर त्या फ्लॅट्सशी म्हाडाचा काहीच संबंध राहणार नाही. याचं कारण हे आहे की यामध्ये राजकीय हस्तक्षेप येईल. आम्हाला तो नकोय, ज्यांना खरचं गरज आहे, त्यांनाच त्याचा लाभ मिळायला हवा. यासाठी आम्ही हे फ्लॅट्स टाटाला देण्याचा निर्णय़ घेतला आहे. ही संपूर्ण प्रक्रिया केवळ सात दिवसांमध्ये झाली. याचा मला अभिमान आहे. टाटा व म्हाडामध्ये तसा करार देखील झाला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.