415 मतदान केंद्रांवर होणार आज मतदान : 2 हजार 500 कर्मचारी सेवेत
प्रतिनिधी / बेळगाव
महानगरपालिकेच्या 58 वॉर्डांसाठी शुक्रवार दि. 3 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. गुरुवारी सर्व मतदान केंद्रांना मतदान यंत्रे रवाना झाली आहेत. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी काही मतदान केंद्रांना भेटी देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली.
गुरुवारी सकाळपासूनच मतदान यंत्रे, निवडणूक कर्मचारी, पोलिसांना बी. के. मॉडेल हायस्कूलमधून वेगवेगळय़ा वाहनांतून मतदान केंद्रांवर पाठविण्यात आले. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱयांनी तेथील कामकाजाची पाहणी केली. सरकारने जारी केलेल्या कोविड-19 मार्गसूचीचे पालन होते की नाही, याची त्यांनी माहिती घेतली.
मतदान केंद्रांवर निघालेल्या अधिकारी व कर्मचाऱयांशी चर्चा करून कशा पद्धतीने काम करावे, समस्या निर्माण झाल्यास काय करावे, याविषयी अधिकाऱयांना सल्ला दिला. कसल्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, याची प्रत्येकाने खबरदारी घ्यावी, अशी सूचनाही जिल्हाधिकाऱयांनी कर्मचाऱयांना केली.
58 वॉर्डांसाठी 4 लाख 31 हजार 383 मतदार आहेत. यामध्ये 2 लाख 15 हजार 364 पुरुष, 2 लाख 16 हजार 19 महिला मतदारांचा समावेश आहे. 402 मतदान केंदे व 13 उपकेंदे अशा एकूण 415 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया चालणार असून प्रत्येक मतदान केंद्रासाठी पाच अधिकारी व कर्मचाऱयांचे नियोजन करण्यात आले आहे. एकूण 2 हजार 500 हून अधिक कर्मचाऱयांना यासाठी जुंपण्यात आले आहे.
जिल्हाधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार 20 टक्के अतिरिक्त कर्मचाऱयांची निवडणूक कर्तव्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदानाची प्रक्रिया होणार असून मुक्त व निर्भय वातावरणात प्रक्रिया पार पाडावी, यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. बेळगावकरांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱयांनी केले आहे.