प्रतिनिधी / सातारा :
जिल्हा कारगृहातील दोन कैद्यांमध्ये झोपण्याच्या कारणावरून शुक्रवारी 6 वाजण्याच्या सुमारास हाणामारी झाली. या हाणामारीत एक कैदी जखमी झाला असून, शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास भीमराव बैले (रा. कुशी ता. पाटण) असे त्याचे नाव आहे.
जिल्हा कारगृहात गेल्या काही दिवसापूर्वी एका पोलीस शिपायाला कैद्याकडून मारहाण करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच शुक्रवारी रात्री गेल्या 10 वर्षापासून शिक्षा भोगत असलेला कैदी विकास भीमराव बैले व अक्षय दिनकर यादव यांच्यात झोपण्यावरून वादावादी सुरू झाली. या वादावादीतून बैले याने यादव याला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करून जखमी केले. तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली. हा मारहाणीविरूद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही दुसरी घटना असल्याने जिल्हा कारगृहातील कैदी व पोलीसांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ए. एस वाघमोडे करत आहेत.