चारशे बदल्या नियमबाह्य झाल्याची शक्यता
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात 2019 मधील शिक्षक बदलीतील घोटाळा प्रकरणी मधुकर पाटील यांनी तक्रार देऊन त्याचा पाठपुरावा केला. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार सांगली जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांच्या पाच सदस्यीय समितीने 400 शिक्षकांच्या बदली प्रक्रियेची चौकशी केली आहे. चौकशीमध्ये बदली प्रक्रियेत घोटाळा झाल्याचे सिद्ध झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे चौकशी अहवालाकडे जि.प.वर्तुळाचे लक्ष आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने 2019 मध्ये सुमारे 400 बदल्या केल्या. यामधील बहुतांश बदल्या या नियमबाह्य होत्या. याबाबत कागल तालुक्यातील शिक्षक मधुकर पाटील यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार विभागीय आयुक्त कार्यालयाकडून जिल्हा परिषदेकडे खुलासा मागवला होता. हा खुलासा समाधानकारक नसल्याने पुन्हा एकदा चौकशी समिती नियुक्त करून बदल्यांची चौकशी केली. यामध्ये तक्रारीत तथ्य असल्याचे चौकशी समितीला आढळले आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी व कर्मचाऱयांवर कारवाईची टांगती तलवार आहे.