सातारा : ह. भ. प. बडातात्या कराडकर यांच्यावर झालेल्या स्थानबद्धतेच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी आज साताऱ्यात पोवई नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय असे दिंडीचे आयोजन होते. मात्र, आज पहाटेच या वारकऱ्यांची पोलिसांनी धरपकड सुरू केली. या सर्व गोष्टींचा निषेध म्हणून आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे वारकऱ्यांनी भजन, कीर्तन करत दिंडीचे आयोजन केले. यावेळी वारकऱ्यांनी सर्व वारकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्याची विनंती केली. मात्र, केवळ 5 वारकऱ्यांनाच जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्याची मागणी मान्य झाल्याने जिल्हा प्रशासनाचा निषेध करत
वारकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशद्वारावर निवेदनाच्या प्रती फाडून निषेध व्यक्त केला.
कोरोना नियमावलीचे पालन करून मोजक्या लोकांना तरी पायी वारीसाठी परवानगी द्यावी. तसेच पायी वारीची मागणी करणाऱ्या वारकऱ्यांची पोलीस प्रशासनाने धरपकड थांबवावी, अशा मागणीचे निवेदन वारकरी जिल्हाधिकाऱ्यांना देणार होते. मात्र, सर्व वारकऱ्यांना भेटण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य न केल्याने वारकऱ्यांनी हे निवेदन प्रवेशद्वारावर फाडले. तत्पूर्वी वारकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भजन, कीर्तन करून केले. यावेळी ह.भ.प. विलासबाबा जवळ आणि वारकरी उपस्थित होते.