देशात नवे 551 प्लान्ट उभारणार- पीएम केअर्स फंडमधून निधी पुरविणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशातील प्राणवायूचा तुटवडा कमी करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी देशातील पीएम केअर्स फंडामधून शासकीय रुग्णालयात साडेपाचशेहून अधिक ऑक्सिजन उत्पादन प्लान्ट स्थापित केले जाणार असल्याचे जाहीर केले आहे. हे प्रकल्प विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील जिल्हा मुख्यालयातील सरकारी रुग्णालयात स्थापित केले जाणार आहेत. पंतप्रधानांनी पीएम केअर्स फंडकडून निधी वाटप करण्यासाठी सैद्धांतिक मान्यता दिली आहे.
देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजनची गरज आहे. मात्र, सध्या देशात मेडिकल ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. ही कमतरता दूर करण्यासाठी केंद्र सरकारने हे मोठे पाऊल उचलले आहे. पंतप्रधान मोदींनी पीएम केअर्स फंडामधून देशात 551 वैद्यकीय ऑक्सिजन बनवणाऱया प्रकल्पांना मंजुरी दिली असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून (पीएमओ) रविवारी देण्यात आली. रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची उपलब्धता वाढविण्याच्या दिशानिर्देशानुसार सार्वजनिक आरोग्य सुविधांच्या अंतर्गत 551 समर्पित वैद्यकीय ऑक्सिजन उत्पादन प्रकल्प स्थापित करण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने सकारात्मक पाऊल उचलले आहे.
रुग्णालये होतील ‘आत्मनिर्भर’
कोविड रुग्ण आणि इतर रुग्णांच्या उपचारासाठी जिह्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनच्या पुरवठय़ात अचानक व्यत्यय येऊ नये आणि ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी ही यंत्रणा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या ऑक्सिजन प्लान्टद्वारे रुग्णालये व जिह्यातील दैनंदिन वैद्यकीय ऑक्सिजनची गरज भागवता येईल, असा दावा केला जात आहे.
मजबूत आरोग्य व्यवस्थेसाठी…
जिल्हा मुख्यालयातील सरकारी रुग्णालयात पीएसए ऑक्सिजन जनरेशन प्लान्ट स्थापित करण्यामागील मूलभूत हेतू सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक मजबूत करणे आणि या प्रत्येक रुग्णालयात ऑक्सिजन निर्मितीची सुविधा सुनिश्चित करणे हा आहे. हे ऑक्सिजन प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्यात येण्याचे निर्देश पंतप्रधानांनी दिले आहेत.