जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांची माहिती
प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी जिल्हय़ात दिवसागणिक गंभीर होणारा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यात येणार आहे. जिह्यात सध्या 78 लसीकरण केंद्रे सुरू असून लवकरच 87 आरोग्य उपकेंद्रात कोरोना लसीकरण सेवा सुरू केली जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांनी दिली.
शासनामार्फत कोरोना प्रतिबंधासाठी आरोग्य विभागाला कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सीन या दोन लसींची उपलब्धता करून देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांत कोरोना लसीकरण केंद्रे सुरू झाली. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र व काही खासगी रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध झाली. तिसऱया टप्प्यात गावपातळीवर कोरोना लसीकरणाची सुविधा देण्यासाठी मायक्रो प्लॅनिंग सुरु आहे. जास्तीत-जास्त लोकांना लस देण्यासाठी गावागावात केंद्र सुरु करण्याचा निर्णय जिल्हा परिषद आरोग्य विभागाने घेतला आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने 87 उपकेंद्रांची निवड केली आहे. लसीकरणासाठी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे.
जिह्यात आतापर्यंत 60 हजाराहून अधिक लोकांना लस देण्यात आली आहे. त्यातील 49 हजार 346 जणांनी पहिला तर 10 हजार 723 जणांनी दुसरा डोसही घेतला आहे. त्यामध्ये 17 हजारहून अधिक ज्येष्ठ नागरिक समाविष्ट आहेत. 1 एप्रिलपासून 45 वर्षावरील सर्वांना लस उपलब्ध करून देण्याची घोषरा केंद्र सरकारने केल्याने लसीकरणाचा वेग वाढवावा लागणार आहे. त्यादृष्टीने लसीकरण केंद्रांची वाढ आवश्यक मानली जात होती.
लस पुरवठय़ाची प्रतीक्षा
रत्नागिरीसाठी कोल्हापूर येथून लसीचा साठा उपलब्ध होतो. दहा दिवसांपूर्वी प्राप्त लसींपैकी सध्या आरोग्य विभागाकडे 500 ते 600 डोस उपलब्ध आहेत. प्रत्येक केंद्रांवर काही डोस शिल्लक आहेत. येत्या 4 दिवसात पुरवठा झाला नाही तर केंद्रांवरील लसीकरणाची कार्यवाही थांबण्याची शक्यता आहे.