प्रतिनिधी/ बेळगाव
शनिवारी बेळगाव शहर व जिल्हय़ात कोरोनाचे 14 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर गेल्या 24 तासांत 377 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सक्रिय रुग्णांच्या संख्येतही दिवसेंदिवस घट होत चालली असून शनिवारी सायंकाळी उपलब्ध झालेल्या माहितीनुसार केवळ 206 सक्रिय रुग्ण आहेत.
विश्वेश्वरय्यानगर, अनगोळ, नानावाडी, श्रीरामनगर-मुतगा परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 26 हजार 177 इतकी झाली असून आतापर्यंत कोरोनामुळे 342 जणांचा मृत्यू झाला आहे तर 25 हजार 627 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
शुक्रवारी रात्रीपर्यंत वेगवेगळय़ा प्रयोगशाळेत 6 हजार 032 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल यायचे होते. शनिवारी प्रलंबित स्वॅबचा आकडा 5655 इतका आहे. गेल्या 24 तासांत 377 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आतापर्यंत 3 लाख 70 हजार 238 जणांची स्वॅब तपासणी झाली असून 3 लाख 36 हजार 421 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
जिल्हा सर्वेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार अद्याप 48 हजार 589 हून अधिक जण चौदा दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत. तर 5 हजार 655 जणांचे अहवाल यायचे आहेत. आतापर्यंत जिल्हय़ातील पावणेचार लाख जणांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यात आले आहे.