प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या कार्यालयातील एका महिला कर्मचाऱयाचा पती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सोमवारी जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली. कोरोना संसर्गाच्या धास्तीने 35 कर्मचारी असलेले हे कार्यालय सकाळी 10 वाजताच बंद केले. जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीसमोरील कागलकर हाऊस इमारतीमध्ये हे कार्यालय असले तरी सोमवारी दिवसभर सर्व विभागांमध्ये अभ्यांगतांना येण्यासाठी मज्जाव केला जात होता.
जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीसमोर कागलकर हाऊस ही इमारत आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसह विविध विभागांची कार्यालये आहेत. सकाळी साडेनऊ वाजता सर्व कर्मचारी कार्यालयात दाखल झाले. पाच दिवसांच्या आठवडय़ामुळे सोमवारी कार्यालयीन कामकाजाचा पहिला दिवस होता. त्यामुळे सकाळपासूनच जिल्हापरिषदेत अभ्यांगतांची मोठी वर्दळ सुरू झाली होती. त्याचवेळी ग्रामसडक योजना विभागातील एक महिला कर्मचाऱयाच्या पतीचा रविवारी रात्री कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्याचे सांगण्यात आले.
ही माहिती अवघ्या दहा मिनीटात सर्व जिल्हा परिषदेमध्ये पसरल्यामुळे कर्मचाऱयांमध्ये एकच खळबळ उडाली. संबंधित महिला कर्मचारी आपल्या विभागात आली होती काय ? ती कोणाच्या संपर्कात आली आहे काय ? याची दिवसभर चर्चा सुरु होती. या महिलेचा स्वॅब घेण्यात आला असून त्याच्या अहवालाकडे सर्व कर्मचाऱयांचे लक्ष लागले आहे.