शिर्डी देवस्थानचे माजी ट्रस्टी गोपिनाथ कोते पाटील यांचे उद्गार
प्रतिनिधी/ कुंभारजुवे
गोव्यासारखी साईभक्ती आपण इतरत्र कुठेही पाहिली नाही. गोमंत साईसेवकांतर्फे गेली चार वर्षे गोवा ते शिर्डी पदयात्रा आयोजित करण्यात येत असून त्याचा आपण साक्षीदार आहे. दरवर्षी शिर्डीला हजारोंच्या संख्येने गोवेकर जातात. बाबांना गोव्याचे मानकुराद आंबे खूप आवडायचे. त्याच आंब्यांच्या माध्यमातून आपली व प्रेमानंद (बाबू) कोचरेकर यांची बांबानी भेट घडवून आणली आणि आज आपले मानसपुत्र झाले आहेत. आपण जीवात जीव असेपर्यंत साईसेवा चालूच ठेवणार व इतरांनाही प्रेरणा देत राहणार, असे उद्गार श्री साईबाबा संस्थान शिर्डीचे माजी ट्रस्टी गोपिनाथ (अण्णा) बयाजीराव कोते पाटील यांनी काढले.
गोमंत साई सेवकतर्फे आयोजित चौथ्या सांगोल्डा ते शिर्डी पदयात्रेच्या शुभारंभी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी ट्रस्टी गोपिनाथ (अण्णा) बयाजीराव कोते पाटील श्री राष्ट्रोळी साईबाबा मंदिर भरड सांगोल्डा मंदिर सभागृहात बोलत होते.
याप्रसंगी गोमंत साई सेवकचे अध्यक्ष प्रेमानंद (बाबू) कोचरेकर, सचिव अनिल नागेकर, खजिनदार विश्वास कदम, श्री राष्ट्रोळी साईबाबा मंदिराचे अध्यक्ष उल्हास मोरजकर, सचिव संतोष केरकर, खजिनदार दामोदर कोचरेकर, अखिल गोमंतक साईसेवा मंडळ गोवाचे अध्यक्ष वज्रधर (राजू) कळंगूटकर, उपाध्यक्ष रामानंद तारी, सचिव सुशिल मोरजकर, सल्लागार रोहिदास कोरगांवकर, नानी पेडणेकर, राजू तारी, प्रसाद नाईक गांवकर, रमेश सावई वेरेकर, सांगोल्डा पंचायतीचे सरपंच अविनाथ नाईक, जिल्हा पंचायत सदस्य रुपेश नाईक, विकास शिरोडकर, संतोष कारेकर, अनिल शेंदाळकर आदी उपस्थित होते.
मान्यवरांचे प्रेमानंद कोचरेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. अध्यक्ष प्रेमानंद कोचरेकर यांनी सांगितले की, यंदाची ही चौथी शिर्डी पदयात्रा असून 110 पदयात्री सहभागी झाले आहे. कोरोना महामारीमुळे या पदयात्रेविषयी शंका होती मात्र बाबांच्या कृपाशीर्वादामुळे प्रेरणा मिळाली. गोव्याच्या कित्येक साईसेवक व इतरांनी विविध अंगाने या पदयात्रेला मदत केल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी कित्येकांचे माजी ट्रस्टी गोपिनाथ (अण्णा) कोते पोटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व बाबांचा फोटो देऊन सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरख मांद्रेकर यांनी केले तर अभार अनिल नागेकर यांनी मानले.
त्यानंतर गोपिनाथ कोते पाटील यांच्या हस्ते पालखीची विधीवत पुजा करण्यात आली व पालखीला खांदा देऊन व श्री राष्ट्रोळी साईबाबा मंदिरातल्या साईबाबांचे आशीर्वाद घेऊन पदयात्रा पालखी समवेत मार्गस्थ करताना मंदिरा बाहेर आणून अध्यक्ष प्रेमानंद कोचरेकर यांच्याकडे सुपूर्द केली.
पदयात्रेचा एकूण प्रवास 16 दिवसांचा असून 609 किमीचा आहे. ही पदयात्रा 22 जानेवारी रोजी दुपारी शिर्डीला पोहोचणार व तिथे साईंचे दर्शन घेऊन 23 रोजी गोव्याला प्रस्थान करणार आहे.