अंत्यविधी शेडवरील पत्रे उखडून गेल्याने करावा लागतोय समस्यांचा सामना : तातडीने समस्यांचे निवारण करण्याची मागणी

प्रतिनिधी /बेळगाव
जुनेबेळगाव स्मशानभूमीतील समस्यांचे निवारण करण्याची मागणी अनेक वेळा करण्यात आली. मात्र, याकडे महापालिकेच्या अधिकाऱयांनी दुर्लक्ष केले आहे. संरक्षक भिंतीचे नुकसान झाले असून अंत्यविधी शेडवरील पत्रे उखडून गेले आहेत. परिणामी येथे येणाऱया नागरिकांना असंख्य समस्यांचा सामना करावा लागत असल्याने महापालिकेचे अधिकारी याकडे लक्ष देतील का? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
येथील स्मशानभूमीतील अंत्यविधी चौथऱयांच्या शेडवरील पत्रे वाऱयाने उखडून पडले असून कोणत्याही क्षणी कोसळण्याचा धोका आहे. संरक्षक भिंत दोन ठिकाणी कोसळली आहे. कचरा डेपोच्या बाजूने भिंतीचे बांधकाम करण्यासाठी खोदाई करण्यात आली. पण भिंतीचे बांधकाम करण्यात आले नसल्याने रखडले आहे. भिंत कोसळल्याने भटक्मया कुत्र्यांचा वावर वाढला आहे. परिसरातील पथदीप खराब झाले असून या ठिकाणी असलेल्या हायमास्ट खांबावरील दिव्यांची चोरी झाल्यापासून या ठिकाणी पथदीप बसविण्यात आले नाहीत. येथील पथदीप झाडावर बसविण्यात आले असून, काही दिवे खराब झाल्याने बंद आहेत. अंत्यविधीच्या शेगडय़ा खराब झाल्या आहेत. पाण्याची सुविधा करण्यात आली आहे, पण नळांना चाव्या नसल्याने पाणी वाया जात असते.
या स्मशानभूमीतील अंत्यदाहिनी वगळता सर्वत्र झाडे-झुडपे आणि रान वाढले आहे. येथील खुल्या जागेत गवत-झुडपे वाढली असल्याने अस्वच्छता निर्माण झाली आहे. सापाकिडय़ांचा वावर वाढल्याने स्मशानभूमीची स्वच्छता करण्याची मागणी महापालिकेकडे करण्यात आली होती. मात्र, याची दखल घेण्यात आली नाही. स्मशानभूमीची भिंत कोसळल्याने बांधकाम करण्याची मागणी करण्यात येत आहे. पण याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱयांनी दुर्लक्ष केले आहे.
सदाशिवनगर स्मशानभूमीच्या विकासासाठी वर्षाला दहा लाखांचा निधी खर्ची घालण्यात येत आहे. पण जुनेबेळगाव स्मशानभूमीच्या विकासाची मागणी कित्येक वर्षांपासून करूनही याची दखल घेण्यात आली नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या स्मशानभूमीच्या विकासाकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे. येथील समस्यांचे निवारण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.