सध्या लॉकडाऊनच्या या काळात नवनवीन उद्योग करून आपण आपल्या घराची, गार्डनची शोभा वाढवू शकता. कुठल्या प्रदर्शनातून वगैरे आपण एखादा किमती असा, आपल्या आवडीचा वाझ आणलेला असतो अन् काहीशा किरकोळ कारणांनी तो एखादे वेळेस फुटतो ही. आता त्या फुटलेल्या वाझाचे तुकडे टाकून देणे देखील अनेकांच्या जिव्हारी येते. अशावेळी आपण याच तुटलेल्या वाझातून छानशी नवीन कलाकृती करू शकता. या वाझाचे तुटलेले छोटे छोटे तुकडे विशिष्ट अशा पद्धतीने बसवून वाझालाच एक वेगळी कलाटणी देऊन आपल्या कल्पनेतून अनोखा असा कलाविष्कार साकारू शकता.

पायऱया बनविलेला वाझ
हा वाझ एवढा कलात्मक रितीने पुन्हा अशाप्रकारे साकारण्यात आला आहे की अशाने एक सुंदर अशी कलाकृतीही आपणास पहायला मिळते. वाझाचे तुटलेले छोटे-छोटे तुकडे घेऊन त्याच्या पायऱया करून त्यात माती घालून त्यावर गवत उगविण्यात आले आहे. असे विविध प्रकार आपण करू शकतो.

अनेक झाडे एकातच
हा तुटलेला वाझ घेऊन त्यात माती घालून तीन-चार प्रकारची शोभेची झाडे उगविण्यात आलेली आहेत. त्यात विविध आकाराचे आकर्षक असे दगडही ठेवण्यात आले आहेत. यामुळे या वाझाच्या शोभेत अजून भर पडली आहे. यात ‘लव्ह बर्ड्स’ ची कलाकृतीही ठेवण्यात आली आहे. अशाप्रकारे आहे त्याच वाझात नाविन्याची भर घालत आपण काहीतरी वेगळे असे करू शकता.

मांडणी महत्त्वाची
हा वाझ जरी तुटलेला नसला तरी यात नाविन्याने झाडे लावण्याचा सुंदर उपक्रम केला आहे. एकीकडे मनाला शांतता देणारी दुर्वा, दुसऱया भागात गवत, आकर्षक असे भिन्न आकारांचे तसेच रंगांचे दगड घालून त्याची शोभा अजून वाढविली आहे. यातही तीन-चार प्रकारची झाडे उगविली आहेत. यात एका झाडाचे खोडही घालण्यात आले आहे. ही मांडणी मात्र सुरेख, आकर्षक अन् कलात्मक अशीच केली आहे.

कल्पतेवर जोर
या वाझाची आखणी सुंदर अन् वेगळय़ाच अशा आकर्षक मांडणीने केली आहे. यात मोठ्ठं मातीचं भांडं घेऊन त्यात माती घालून त्यावर वाझही ठेवून तीन-चार प्रकारची झाडे उगविलेली आहेत. त्यात कलात्मक दृष्टय़ा तयार केलेले कुंपण, घर, शिडी अशा अनेक बारीक-सारीक गोष्टी घेऊन या वाझाचे सौंदर्य आपण अजून वाढवू शकता.
सजवू वाझ…
घराची स्वच्छता करताना आपल्याला रंगीत पेपर, काही लहान आकृती सापडतात. त्या एवढय़ा छान असतात की आपण फेकू शकत नाही. त्याचा आपण इथे वापर करू शकतो…