कोरोना कालावधीत जुन्या वाहनांना पसंती
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कोरोना कालावधीत सामाजिक अंतर राखण्यासाठीच्या नियमावलीमुळे पब्लिक ट्रान्सपोर्टच्या ऐवजी खासगी वाहनांना अधिक पसंती मिळत गेली आहे. परंतु याच दरम्यान नवीन कार खरेदी करण्याला फाटा देत ग्राहकांनी जुन्या कारची खरेदी करण्यावर भर दिला असल्याची माहिती आहे. आर्थिकदृष्टय़ा परवडत नसल्याने अनेकांनी कमी किंमतीत मिळणाऱया जुन्या कार्सना पसंती दर्शवली आहे. आर्थिक वर्ष 2019-20 या कालावधीत जवळपास 14 लाख जुन्या कारची विक्री झाली असून 2020-21 मध्ये जवळपास ही विक्री तीन पटीने वाढली असून जुन्या 39 लाख कार्स विक्री झाल्याची नोंद आहे.
ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट इंडिया ब्लूच्या आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष 2020-21 च्या पहिल्या तिमाहीत नवीन वाहनांच्या विक्रीत 36 टक्क्यांची घसरण राहिली आहे.
एप्रिल 2020 च्या प्रारंभी बीएस 6 प्रणाली नव्या वाहनांसाठी लागू करण्यात आली आहे. या कारणामुळे कंपन्यांनी आपल्या वाहनांच्या किमती अधिक प्रमाणात वाढवल्या असून ग्राहकांकडे तेवढे पैसे नसल्यामुळेही ग्राहकांनी जुन्या कार्सना पसंती दिली आहे.