वार्ताहर/ कराड
राज्यभरातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना कराड तालुक्यात मात्र बाधित वाढीचे सत्र थांबताना दिसत नाही. गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत कराड तालुक्यात सर्वाधिक 6 हजार 562 रूग्ण मे महिन्यात सापडले होते. मात्र जुलै महिन्यांच्या केवळ 15 दिवसातच 4 हजार दोनशे रूग्ण सापडल्याने जुलै महिन्याची वाटचाल रेकॉर्डब्रेकच्या दिशेने सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे नागरिकांनी आता स्वतःहून कोरोनाच्या साखळय़ा तोडण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.
कोरोना संकट सुरू झाल्यापासून कराड तालुका कोरोनासाठी हॉटस्पॉट ठरला आहे. तालुक्यात आजवर एकूण 31 हजार 300 रूग्णांची नोंद झाली आहे. तर 28 हजार 612 बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. यातील 638 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 1 हजार 800 रूग्ण उपचारात आहेत. राज्यभरात दुसरी लाट ओसरत असल्याने दिलासा मिळत आहे. सातारा जिल्हय़ातील काही भाग व कराड तालुक्यात मात्र अद्याप कोरोना बाधितांचे सत्र सुरूच असल्याने जिल्हावासियांना लॉकडाऊनचा सामना करावा लागत आहे.
कराड तालुक्यात दररोज सरासरी 250 ते 300 बाधित आढळून येत आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले आहेत. होम आयसोलेशनमध्ये असणाऱया रूग्णांचे नातेवाईक व रूग्ण बाहेर फिरताना आढळून आल्याने जिल्हय़ात होम आयसोलेशन बंद करून ग्राम विलगीकरण कक्ष सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र निम्म्याहून अधिक रूग्ण घरीच उपचार घेत आहेत. बाधित सापडणाऱया घराच्या आवारात कंटेनमेंट झोन करण्याचा विसर प्रशासनाला पडला आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या नावाने बोंब सुरू आहे. त्यामुळे कराड तालुक्यातील बाधित वाढीचे सत्र कधी थांबणार? जिल्हावासियांना कधी दिलासा मिळणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कराडला बाधित वाढीचा वेग असाच राहिला तर कराडसाठी जुलै महिना कोरोना बाधितांसाठी रेकॉर्ड बेक ठरण्याची भीतीही व्यक्त होत आहे. त्यामुळे नागरिकांनीही काळजी घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
कोरोना संकट सुरू झाल्यापासून कराड तालुक्यात महिनानिहाय सापडलेले रूग्ण पुढीलप्रमाणे – मार्च (2020) -0, एप्रिल-33, मे-148, जून-159, जुलै-519, ऑगस्ट-2997, सप्टेंबर-4395, ऑक्टोबर-1002, नोव्हेंबर-298, डिसेंबर-171, जानेवारी (2021)-89, फेब्रुवारी-138, मार्च-592, एप्रिल-4616, मे-6562, जून-5375, जुलै (15 तारखेपर्यंत)- 4205.