ऑटो क्षेत्रात अपेक्षेपेक्षाही मजबूत विक्री : मारुती सुझुकीची विक्रीत उच्चांकी झेपः ट्रक्टर विक्री तेजीत
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
वाहन कंपन्या कोरोनाच्या पहिल्या लाटेमधून सावरत असताना दुसऱया लाटेचा सामनाही कंपन्यांना करावा लागत आहे. याच संकट काळात जून महिन्यात वाहनाच्या विक्रीचे आकडे सादर करण्यात आले आहेत. सदरचे विक्रीचे आकडे हे अपेक्षेपेक्षाही अधिक झाले आहेत.
देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी इंडियाने जूनमध्ये महिन्याच्या आधारे 217 टक्क्यांची वाढ प्राप्त केली आहे. यासोबत बजाज ऑटोची विक्री ही वर्षाच्या आधारे 24 टक्क्यांनी वाढली आहे. तर एस्कॉर्ट्सने मागील महिन्यात 12,533 वाहनांची विक्री केली.
मारुतीची झेप
जून महिन्यात मारुतीच्या कारला वाढत्या मागणीमुळे विक्रीने तेजीचा टप्पा गाठला आहे. महिन्याच्या आधारे विक्रीत 217 टक्क्यांची वाढ होत 1,47,368 वर राहिली आहे. यामध्ये कॉम्पॅक्ट वाहने आणि युटिलिटी वाहनांना मागणी वाढली आहे.
हय़ुंडाईची 77 टक्क्यांची तेजी
मागील महिन्यात हय़ुंडाई मोटार इंडिया लिमिटेडने जवळपास 77 टक्क्यांची महिन्याच्या आधारे तेजी प्राप्त केली असून 54,474 युनिटची विक्री केली आहे. मे महिन्यात हा आकडा 30,703 वर राहिला होता.
टाटा मोटर्सची विक्री 59टक्के वधारली
मागील महिन्यात टाटा मोर्ट्सने महिन्याच्या आधारे 59 टक्क्यांची वाढ प्राप्त केली आहे. यासोबत एकूण 24,110 वाहने विकली आहेत. यांच्या प्रवासी वाहन विक्रीला मोठी पसंती मिळाली आहे.
बजाज ऑटोची विक्री
जूनमध्ये बजाज ऑटोने जवळपास 24 टक्क्यांची वाढ मिळवत सोबत 3,46,136 वाहने विकली आहेत. मागील वर्षी जूनमध्ये 2,78,097 इतकी वाहन विक्री राहिली आहे.
एस्कॉर्ट्स ट्रक्टरची विक्री मजबूत
एस्कॉर्ट्स ट्रक्टरची एकूण विक्री ही 12,533 युनिटवर राहिली आहे. मागील वर्षातील जून महिन्यात कंपनीने 10,851 ट्रक्टरची विक्री केली होती.
एमजीची विक्री तीन पटीने तेजीत
जून महिन्यात एमजी मोर्ट्सच्या ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे पहावयास मिळाले आहे.
विक्री वाढण्याची मुख्य कारणे
1.उत्पादन प्रकल्प सुरु
कोरोनाच्या महामारीमुळे कंपन्यांनी आपले वाहन निर्मितीचे प्रकल्प बंद ठेवले होते. तर काही कंपन्यांनी ऑक्सिजन प्रकल्प सुरु केले होते. परंतु दुसऱया लाटेचा प्रभाव काहीसा ओसरत असल्याने पुन्हा नव्याने वाहन उत्पादन सुरु झाल्याचा फायदा विक्रीला झाला आहे.
2.पुरवठा साखळी सुरु
पुरवठा साखळी प्रभावीत झाल्याने मे महिन्यात कार विक्री घटली होती. परंतु ती आता सुरु झाली असल्याने कच्च्या मालासोबत अन्य साहित्याचा पुरवठा होत असल्याची मदत विक्री मजबूत करण्यास कंपन्यांना झाली आहे.
3.लॉकडाऊनमधून काहीसा दिलासा ः कोविडच्या वाढत्या संसर्गामुळे एप्रिलपासून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. परंतु वाढत्या लसीकरणासोबत लॉकडाऊनमधील शिथिलतेमुळे वाहन विक्रीला मोठी मदत झाल्याचे पहावयास मिळाले आहे.