पुरुष एकेरीत डॅनिएल मेदवेदेव्ह विजेता, जोकोविचला सरळ सेट्समध्ये नमवले
न्यूयॉर्क / वृत्तसंस्था
पुरुष एकेरी टेनिसमध्ये 1969 नंतर प्रथमच वर्षातील चारही ग्रँडस्लॅम जिंकण्याचे नोव्हॅक जोकोविचचे स्वप्न अगदी अंतिम टप्प्यात भंगले. रविवारी रंगलेल्या अमेरिकन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेतील फायनलमध्ये डॅनिल मेदवेदेव्हने त्याला 6-4, 6-4, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभवाचा धक्का दिला. मेदवेदेव्हने एकीकडे जोकोविचची संधी हुकवली. शिवाय, आपल्या कारकिर्दीतील पहिलेवहिले प्रतिष्ठेचे चॅम्पियनशिप जेतेपदही नोंदवले.
जागतिक क्रमवारीतील अव्वलमानांकित जोकोविचने यंदा ग्रँडस्लॅम स्पर्धेत 27-0 अशी एकतर्फी वाटचाल कायम राखली होती. पण, येथील अंतिम लढतीत त्याचा हा विजयरथ अखेर मेदवेदेव्हने रोखला.
जोकोविचने यंदा फेब्रुवारी महिन्यात ऑस्ट्रेलियन ओपन फायनलमध्ये मेदवेदेव्हचा पराभव करत वर्षातील पहिले ग्रँडस्लॅम जिंकले व त्यानंतर जूनमध्ये क्ले कोर्टवर प्रेंच ओपनचे तर जुलैमध्ये ग्रास कोर्टवर विम्बल्डनचे जेतेपद जिंकत तो कॅलेंडर-ईयर-स्लॅमच्या उंबरठय़ावर पोहोचला. येथे विजय संपादन केला असता तर तो 1969 नंतर एकाच वर्षातील सर्वही ग्रँडस्लॅम जिंकणारा पहिलाच खेळाडू ठरला असता. मात्र, सरळ सेट्समधील पराभवामुळे त्याची ही संधी अगदी निसटत्या फरकाने हुकली.
सर्बियाच्या या 34 वर्षीय दिग्गज खेळाडूला आपला सर्वोत्तम खेळ साकारण्याच्या अगदी आसपासही पोहोचता आले नाही. या लढतीदरम्यान जोकोविचने तब्बल 38 अनफोर्स एरर्स केले. शिवाय, अगदी उशिरा मिळालेल्या ब्रेकचे देखील गुणात रुपांतर करता आले नाही. ऑर्थर ऍश स्टेडियमवरील या लढतीदरम्यान त्याला चेअर अम्पायरकडून कोड व्हायोलेशनबाबत ताकीदही दिली गेली. जोकोविचने यावेळी गुण गमावल्यानंतर निराशा व्यक्त करताना रॅकेट कोर्टवर कित्येकदा जोरात आदळली होती.
जागतिक क्रमवारीतील द्वितीय मानांकित, 6 फूट 6 इंच उंचीच्या मेदवेदेव्हने आपल्या उंचीचा पुरेपूर लाभ घेत कोर्ट कव्हरेजमध्ये उत्तम वर्चस्वाचा दाखला दिला आणि सहजसुंदर ग्राऊंडस्ट्रोक्समध्ये सातत्य राखत जोकोविचला खऱया अर्थाने जेरीस आणले. वास्तविक, फ्लशिंग मेडोजच्या हार्ड कोर्टवर जोकोविचने 6 विजयांसह अगदी थाटात अंतिम फेरी गाठली होती. मात्र, जो अति आवश्यक होता, तोच सामना त्याला जिंकता आला नाही.
जोकोविच येथे विक्रमी 31 व्या ग्रँडस्लॅम फायनलमध्ये पोहोचला होता. हार्ड कोर्टवर यापूर्वी त्याच्या खात्यावर 6 जेतेपदे होती. पण, येथे त्याला आपला खेळ अपेक्षेप्रमाणे उंचावता आला नाही. आताही तो रॉजर फेडरर व राफेल नदाल यांच्यासह 20 ग्रँडस्लॅम विजयासह संयुक्त बरोबरीत आहे.
यापूर्वी, एकाच कॅलेंडर वर्षातील चारही ग्रँडस्लॅम विजय संपादन करण्याचा पराक्रम फक्त रॉड लेव्हर यांना 1962 व 1969 मध्ये दोनवेळा करता आला. याशिवाय, महिला गटात 1988 मध्ये असा पराक्रम गाजवणारी स्टेफी ग्राफ पेक्षकांच्या गॅलरीत प्रत्यक्ष हजर होती. जोकोव्हिच आता कॅलेंडर वर्षातील पहिले तिन्ही ग्रँडस्लॅम जिंकल्यानंतर अमेरिकन ग्रँडस्लॅमच्या फायनलमध्ये पराभूत होणाऱया जॅक क्रॉफर्ड (1933) व ल्यू हॉड (1956) यांच्या पंक्तीत दाखल झाला आहे.
महिला दुहेरीत समंथा स्टोसूर, झँग शुआई अजिंक्य

ऑस्ट्रेलियाची समंथा स्टोसूर व चीनची झँग शुआई या जोडीने अमेरिकन टेनिस ग्रँडस्लॅमच्या महिला दुहेरीचे विजेतेपद संपादन केले. त्यांनी अंतिम फेरीत कोको गॉफ व कॅटी मॅकनली यांच्याविरुद्ध 6-3, 3-6, 6-3 अशा फरकाने विजय मिळविला. स्टोसूर व झँग या जोडीने यापूर्वी 2019 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनमध्येही जेतेपदावर आपली मोहोर उमटवली होती.
स्टोसूर-झँग यांनी पहिला सेट 6-3 अशा सहज फरकाने जिंकल्यानंतर प्रतिस्पर्धी गॉफ व कॅटी यांनी दुसऱया सेटमध्ये 6-3 असा विजय नोंदवत बरोबरी साधली. मात्र, निर्णायक तिसऱया सेटमध्ये स्टोसूर व झँग यांनीच बाजी मारली. 37 वर्षीय स्टोसूरने दशकभरापूर्वी अमेरिकन ग्रँडस्लॅममध्येच महिला एकेरीचे जेतेपदही जिंकले होते.