इचलकरंजीत स्मार्ट मेडिसीन डिस्पेन्स उपकरणाची निर्मिती, निखिल पडते व सहकाऱयांनी बनविले देशातील पहिले उपकरण
संजय खूळ/इचलकरंजी
तुमच्या घरात फक्त ज्येष्ठ नागरिकच आहेत का? त्यांना वेळेत व बिनचूक औषध देण्याची काळजी तुम्हाला लागली आहे का? पण यापुढे ही काळजी आता राहणार नाही. कारण इचलकरंजीच्या संशोधकांनी स्मार्ट मेडिसीन डिस्पेन्सर हे अत्याधुनिक उपकरण विकसित केले आहे. येथील जंगस टेक्नॉलॉजी या कंपनीने हे यंत्र तयार केले असून याद्वारे वेळेत व बिनचूक औषधे देता येणार आहेत. या उपकरणामध्ये एक महिन्याची औषधे ठेवता येणार आहेत.
अनेकदा घरामध्ये ज्येष्ठ नागरिक अथवा फक्त रुग्णच असतील तर संबंधित नातेवाईकांना त्यांच्या वेळोवेळी घ्यावयाच्या औषधांबाबत काळजी लागते. घरात कोणीही नसताना निर्धास्तपणे एखाद्या उपकरणामार्फत रुग्णांना औषधे वेळोवेळी देता येतील का, याबाबत देशात अनेकवेळा प्रयत्न झाला. अखेर इचलकरंजीतील संशोधक निखिल पडते व त्यांच्या टीममधील सहकाऱयांच्या प्रयत्नांना यश आले. हे उपकरण आता लवकरच बाजारात येणार आहे.
असे आहे उपकरण…
सामान्यांना परवडेल आणि अत्यंत कॉम्पॅक्ट असे हे उपकरण आहे. यामध्ये तब्बल एक महिन्याची सर्व औषधे भरून ठेवता येतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार यातील सर्व औषधे दिवसभर ठराविकवेळी या यंत्रातून बाहेर येतात व संबंधित रुग्णांना सूचना करतात. अलार्मबरोबर बाहेर आलेली औषधे कोणकोणती आहेत याचे संभाषणही हे मशीन करते. औषधे घेतल्यास तत्काळ संबंधितांना मेसेजही जाणार आहे. अनेकवेळा मोबाईलवरून संभाषण करणे अथवा व्हिडिओ कॉलवर बोलणे ज्येष्ठ नागरिकांना शक्य होत नाही. त्यासाठी या उपकरणात थेट व्हिडीओ कॉन्फरन्सची सोयही करण्यात आली आहे. रुग्णांना तत्काळ औषधासह अन्य सर्व्हिस उपलब्ध करून देण्यासाठीही हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे उपकरण कोणत्याही सॉफ्टवेअरला सहजपणे कनेक्ट होईल, अशी त्यात यंत्रणा विकसित आहे.
हे यंत्र डॉक्टर आणि संबंधित नातेवाईक अथवा काळजीवाहक यांच्याशी नेहमी कनेक्टेड असेल. औषध घेण्याची सूचना करून औषधे बाहेर काढून देण्याची सोयही या उपकरणांमध्ये आहे. औषधे घेतली की नाही याबाबतचा संदेश संबंधित नातेवाईक अथवा काळजीवाहक यांना जाईल. गरज वाटल्यास डॉक्टर वेळोवेळी या मशीनद्वारे औषधाचा डोस बदलू शकतील.
लवकरच बाजारात
देशात प्रथमच तयार झालेले हे उपकरण नक्कीच अनेक रुग्णांच्या नातेवाईकांची चिंता दूर करणारे आहे. कोरोना काळात आलेल्या अडचणीनंतर संशोधकांना या उपकरणाची संकल्पना सुचली. या उपकरणाबाबत विविध कंपन्यांशी करार होईल. काही महिन्यात मेड इन इंडिया हे उपकरण अनेक रुग्णांना वरदान ठरेल. – निखिल पडते, संशोधक
निखिल पडते यांचे संशोधन
निखिल पडते हे जंगस टेक्नॉलॉजीचे संस्थापक आहेत. इंडियन इन्स्टिटÎूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी मुंबई) या ठिकाणी मॅन्युफॅक्चरींग अँड मशीन टुल्स यामध्ये मास्टर डिग्री पूर्ण केली आहे. पदव्युत्तर शिक्षणानंतर त्यांनी विमान आणि ऊर्जा क्षेत्रात डिझाईन इंजिनिअर म्हणून काम केले आहे. जंगसची स्थापना करण्यापूर्वी मशीन टुल्स, ऍटोमेशन डायज आणि ब्रेक पिस्टनचे उत्पादन करणाऱया मेकासॉफ्टमध्ये भागीदार होते.