झाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या समाधीस्थळी केले नमन
वृत्तसंस्था/ ग्वाल्हेर
मध्यप्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये एका छायाचित्राबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. केंद्रीय राज्यमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पहिल्यांदाच झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या समाधीस्थळी हात जोडून नमन केले आहे. ग्वाल्हेरमध्ये ज्योतिरादित्य यांनी सिंधिया परिवाराचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला. सिंधिया घराण्यातील कुठल्याही महाराजाने कधीच न केलेले कृत्य त्यांनी करून दाखविले आहे.
ज्योतिरादित्य यांनी अचानक झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या समाधीस्थळी पोहोचून तेथे वंदन केले. याचबरोबर तेथे प्रार्थना करत पुष्पांजली वाहिली तसेच प्रदक्षिणाही घातली आहे.
टीकाकारांची तोंडं केली बंद
1857 मधील पहिले स्वातंत्र्ययुद्ध आणि झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांचा विषय उपस्थित झाल्यावर सिंधिया परिवाराच्या भूमिकेचा मुद्दा समोर येतो. काही संघटनांकडून याचा वारंवार उल्लेख करण्यात येतो. लक्ष्मीबाई यांना सिंधिया परिवाराने साथ न दिल्याचा मुद्दा सातत्याने उपस्थित केला जात असतो. परंतु काँग्रेस सोडून ज्योतिरादित्य भाजपमध्ये सामील झाल्यापासून ते राणी लक्ष्मीबाई यांच्या समाधीस्थळी येणार का हा प्रश्न उपस्थित होत होता. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी अलिकडेच सिंधिया घराण्याला विश्वासघाताचा इतिहास असल्याची टिप्पणी इतिहासाचा दाखला देत केली होती. या पार्श्वभूमीवर ज्योतिरादित्य यांनी राणी लक्ष्मीबाई यांच्या समाधीस्थळाचा दौरा करून टीकाकारांची तोंडं एकप्रकारे बंद केली आहेत.