मंत्र्यांच्या दौऱ्याचा धसका; कातडी बचावासाठी गतिमान हालचाली
प्रतिनिधी / सांगली
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे शनिवारी महालिकेत आढावा बैठक घेणार आहेत. त्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या विभागाचा कारभार कसा चोख आहे. हे दाखविण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. महापालिकेत त्याची लगबग पाहायला मिळत आहे. दरम्यान महापूर, कोरोना मध्ये झालेल्या वादग्रस्त कारभाराचा मंत्री शिंदे यांच्या समोर पंचनामा होण्याची शक्यता आहे.
राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे शनिवारी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. महापालिकेत सकाळी १०.३० वाजता आढावा बैठक घेणार आहेत. वर्षभरात महापालिका प्रशासनाच्या गैर कारभराविरोधात मंत्री शिंदे यांच्याकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. विशेषतः आयुक्तांचा हेकेखोरपणा, कोरोना काळातील उधळपट्टी, बंगल्यावर केलेली उधळपट्टी, नाला सफाई, महापूत काळात स्वच्छतेसाठी वापरण्यात आलेल्या वाहनांच्या भांड्यामध्ये झालेली अनियमितता, मनपातील वीज बिल घोटाळा सह अन्य गंभीर मुद्द्यावर बैठकित चर्चा होणार आहे.