ऑनलाईन टीम / रांची :
झारखंडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. या राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाने ग्रासले आहे. 3 पोलीस अधीक्षकांसह आतापर्यंत 4 हजार 45 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील 626 कर्मचाऱ्यांवर अजूनही उपचार सुरू आहेत. तर 9 जणांनी आपला जीव गमावला असून अन्य कर्मचाऱ्यांची प्रकृती सुधारली आहे आणि त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

सोमवारी झारखंडमध्ये 1326 नवे कोरोना रुग्णांची नोंद झाली तर 10 जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 38, 438 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 410 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर कालच्या दिवसात 23,009 नमुन्यांची चाचणी करण्यात आली.
विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आता पर्यंत आढळलेल्या एकूण 38,438 रुग्णांपैकी 26,448 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 11,580 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.