
वार्ताहर /नंदगड
झुंजवाड (के. एन.) ता. खानापूर येथे शेतात ऊस लावण्यासाठी नांगरट करत असताना बांधावरून ट्रक्टर पलटी होऊन त्याखाली सापडून शेतकऱयाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी 11 च्या दरम्यान घडली. यामध्ये बसाप्पा गणपती पाटील (वय 46) राहणार झुंजवाड यांचा जागीच मृत्यू झाला.
बसाप्पा पाटील हे आपल्या शेतात ऊस लावण्यासाठी नांगरट करत होते. ट्रक्टर पाठीमागे घेत असताना जवळच असलेल्या बांधावरून ट्रक्टर पाच फूट खोल असलेल्या त्यांच्या शेतातील दुसऱया गाद्यामध्ये पलटी झाला. बसाप्पा हे ट्रक्टरखाली दाबले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. आपल्याच शेतात काम करत असल्यामुळे त्यांच्या घरची मंडळी तेथेच होती. घटनेची माहिती लागलीच सर्वांना कळताच ट्रक्टरखाली सापडलेल्या बसाप्पा यांना ट्रक्टर उचलून बाहेर काढण्यात आले. परंतु ट्रक्टरच्या वजनाने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. अपघाताची नोंद नंदगड पोलिसात झाली आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, दोन मुलगे, एक मुलगी व भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.