वार्ताहर / झुआरीनगर
झुआरीनगर पट्टय़ात चौपदरी महामार्गावर झुआरी इंडियन ऑईल टँकिंगजवळ बिबटय़ा वाघ आढळल्याने भीतीचे वातारवण पसरलेले आहे. सोमवारी रात्री आठच्या सुमारास हा बिबटय़ा महामार्गाच्या बाजुने असलेल्या संरक्षक कुंपणाच्या बाजुने फिरत असल्याचे काहीनी पाहिले. सोशल मिडियावर या बिबटय़ाचा फोटो वायरल झाला व ही बातमी सर्वत्र पसरली. सध्या वाहनचालकांनीही या बिबटय़ाची धास्ती घेतलेली आहे.

झुआरीनगरात महामार्गापासून अवघ्या काही अंतरावर धाट झाडी आहे. नैसर्गिक विधीसाठी या वस्तीतील लोकांची या झाडीत सतत ये जा असते. या त्या ठिकाणी व वस्तीजवळच बिबटय़ाचे दर्शन झाल्यामुळे येथील लोक सध्या बरेच घाबरलेले आहेत. या भागात भटकी कुत्रे, बकऱया, डुकरांचाही वावर असतो. अशाच भक्ष्याच्या शोधात हा बिबटा आला असावा. टाळेबंदीमुळे गेले कित्येक दिवस हा महामार्ग सुनसान झालेला होता. त्यामुळे रानटी जनावरे या भागात येत असावीत असा तर्क काही लोकांकडून व्यक्त होत आहे. या चौपदरी महामार्गावरचे बहुतेक पथदीप पेटत नाहीत व त्याचबरोबर दुभाजकांमधली झाडेही खूपच वाढलेली आहेत. अशावेळी रानटी जनावरे धबा धरून लोकांवर हल्ला करू शकतात. सांकवाळ पठारावर यापूर्वीही बिबटय़ा वाघाचे दर्शन झालेले आहे. या जंगलात पट्टेरी वाघालाही काहीनी पाहिले असल्याचे बोलले जाते.