मराठा मंडळ इंजिनिअरिंगच्या चार विद्यार्थ्यांची कामगिरी

प्रतिनिधी /बेळगाव
बाजारातून सुटे भाग आणून ड्रोन तयार करणे सहज शक्मय आहे. पण टाकावू साहित्यातून ड्रोनसारखे अत्याधुनिक यंत्र तयार करणे कौशल्याचे काम आहे. अशी कामगिरी मराठा मंडळ इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी केली आहे.
नितेश माहुरकर, कपिलनाथ पाटील, मनीषा मठाधिकारी, भाग्या खांडेकर हे ते विद्यार्थी आहेत. त्यांनी जुन्या एलसीडी टीव्हीच्या भागातून कार्बन फायबर बॉडी, टाकावू
ऍल्युमिनियम पाईप्समधून ड्रोनचे हात, जुन्या प्लायवूडपासून चौकट तर प्लास्टिक बाटल्या व प्लास्टिक फाईल्स वापरून ड्रोन तयार केला. मोटार विद्यार्थ्यांनी घरीच बनविली. त्याला वीजपुरवठा हा खराब मोबाईलच्या लिथिअम बॅटरीमधून देण्यात आला. पंख्यांसाठी जुन्या संगणकाच्या कुलींग फॅन्सचा वापर केला. फक्त रेडिओ ट्रान्समिशनसाठी नवीन आर्डिनो बोर्ड कंट्रोलर विकत घेतला.
हा ड्रोन 80 मी. उंच उडू शकतो. तो 200 मी. त्रिज्येत नियंत्रणात राहतो. त्याचे वजन 900 ग्रॅम तर हाताची लांबी 27 सें. मी. आहे. यासाठी 6 हजार रुपये खर्च आला असून बाजारात याची किंमत 20 हजार रु. आहे.
कृषी क्षेत्रात पिकांवर औषध फवारणीसाठी व खूप उंचीवरील आग विझविण्यासाठी याचा उपयोग होईल, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. या प्रकल्पाला रोबोटिक्स विभागाचे प्रा. अनुज देशपांडे व मेकॅनिकल विभागाचे प्रा. बिद्री यांचे मार्गदर्शन लाभले.
प्राचार्य डॉ. डी. जी. कुलकर्णी यावेळी म्हणाले, अभिनव कल्पना हा यशस्वी होण्याचा मंत्र आहे. अपयश ही शिकण्याची पहिली पायरी आहे.
अभिनव कल्पनांना पाठिंबा
संस्थाध्यक्षा राजश्री नागराजू यांनी, फेडरेशन ऑफ कर्नाटक चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रीजमध्ये याची नोंद झाली असून, राज्य सरकारच्या उद्योग व वाणिज्य विभागातर्फे अशा अभिनव कल्पनांना पाठिंबा दिला जातो. संस्थेतर्फे विविध प्रकल्प व उपक्रमांना प्रोत्साहन दिले जाते, असे सांगितले.