टियागो सीएनजी व टिगोर सीएनजीचे सादरीकरण
नवी दिल्ली
टाटा मोर्ट्सने आपल्या टियागो सीएनजी आणि टिगोर सीएनजीचे सादरीकरण केले आहे. यामध्ये टियागोची सुरुवातीची किमत 6.10 लाख ते 7.70 लाख रुपये एक्सशोरुम असणार असून यामध्ये टियागो सीएनजी चार मॉडेल्समध्ये सादर होणार असून टिगोर सीएनजी दोन मॉडेल्समध्ये उपलब्ध होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
सदरच्या कार्सचे सादरीकरण केल्यानंतर टाटा मोर्ट्सने दावा केला आहे, की सीएनजी कार्स बेस्ट इन क्लास पॉवर सोबत येत असून कंपनीने याला आपल्या 1.2 लिटर रेवोट्रोन इंजिनवर विकसीत केले आहे. यामुळे रस्त्याची अवस्था कोणत्याही स्थितीत असली तरी टाटाच्या सीएनजी कार्स चालविताना एक वेगळाच अनुभव मिळणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान टाटा मोर्ट्सने आपल्या सीएनजी कार्सवर गॅस लिकची माहिती देणारी सुविधा मिळणार असल्याचे म्हटले आहे. यामध्ये गॅसची गळती होण्यास सुरुवात झाल्यास गाडी आपोआप सीएनजीवरुन पेट्रोलवर चालणार असून याची माहिती चालकालाही मिळणार आहे.
बाजारात अगोदरपासून सीएनजी कार
सध्या भारतीय बाजारात फिटेड सीएनजी कारमध्ये मारुती सुझुकी आणि हय़ुंडाई मोर्ट्सचा दबदबा आहे, परंतु आता टाटा कंपनीच्या सीएनजी कार्स या कंपन्यांना टक्कर देणार आहेत. मारुती एस-प्रेसो, सेलेरियो, वॅगनार, ईको, आल्टो आणि इर्टिगाच्या गाडय़ा आहेत.