सुविधांच्या नावाखाली रस्त्यांची दुरवस्था : ठिकठिकाणी टाकलेल्या गॅसपाईपसह मातीच्या ढिगाऱयांमुळे नागरिकांना अडचण

प्रतिनिधी /बेळगाव
टिळकवाडी भागात गॅस पाईप घालण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम करताना रस्त्यांची खोदाई करण्यात आली असून जिकडे-तिकडे मातीचे ढिगारे आणि चरी दिसून येत आहेत. ठिकठिकाणी टाकण्यात आलेल्या गॅसच्या पाईप आणि मातीच्या ढिगाऱयांमुळे नागरिकांना अडचण निर्माण झाली आहे. संपूर्ण रस्त्यावर माती पसरल्याने रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विविध रस्ते स्मार्ट बनविण्यात आले आहेत. स्मार्ट सिटी योजनेत टिळकवाडी परिसराचा समावेश करूनदेखील येथील रस्त्यांच्या विकासाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. काही ठराविक रस्त्यांवर पेव्हर्स घालण्याचे काम सुरू आहे. मात्र काही रस्त्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. अशातच आता टिळकवाडी परिसरात गॅस लाईन घालण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. घरोघरी गॅस जोडणी देण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी गॅसवाहिन्या घालण्यात येत आहेत.

त्याकरिता रस्त्याच्या दुतर्फा खोदाई करण्यात येत आहे. खोदाई सत्रामुळे रस्त्यांची दैनावस्था झाली असून टिळकवाडी परिसरातील एकही रस्ता सुस्थितीत नसल्याचे निदर्शनास येत आहे. काही रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र नुकताच केलेल्या रस्त्यांशेजारी गॅसवाहिनीसाठी खोदाई करण्यात आल्याने रस्ता खराब झाला आहे. गॅसवाहिन्या घातल्यानंतर रस्त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. मात्र हे काम करण्यात येत नाही. परिणामी रस्त्यांशेजारी खोदण्यात आलेल्या चरीवर मातीचे ढिगारे साचले आहेत. दुतर्फा खोदण्यात आलेल्या चरीमुळे वाहनधारकांना अडचणींचे ठरले आहे.

वाहनांवर धुळीचा थर
सर्वत्र माती पसरल्याने रस्त्यांना लाल रंगाचे स्वरुप आले आहे. या मातीवरूनच वाहने ये-जा करीत असल्याने धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. बऱयाच दिवसांपासून खोदलेल्या रस्त्यांची पुन्हा दुरुस्ती केली नसल्याने घरांवरती तसेच वाहनांवर धुळीचा थर साचला आहे. त्यामुळे टिळकवाडी परिसरातील रहिवासी हैराण झाले आहेत. नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. ही बाब चांगली असली तरी नागरिकांना त्रास होवू नये, याची दक्षता घेण्याची जबाबदारी कंत्राटदाराची आहे. मात्र कत्राटदाराने कानाडोळा केला आहे. ठिकठिकाणी खोदलेल्या चरीमध्ये वाहने अडकण्याचे प्रकारही घडत आहेत. नागरिकांना अडचण होणार नाही, याबाबत खबरदारी घेणे व रस्त्यांच्या दुरुस्तीची सूचना कंत्राटदाराला करण्यात येते. पण सूचनांचे पालन होत नाही. त्यामुळेच वाहनधारक व रहिवाशांना समस्यांचा सामना करावा लागत आहे.
खोदाई सत्राला नागरिक कंटाळले
टिळकवाडीत प्रत्येक रस्त्यांवर खोदाई सुरू असून खोदाई सत्राला नागरिक कंटाळले आहेत. महिन्याभरापासून ही परिस्थिती निर्माण झाल्याने संताप व्यक्त होत आहे. सुविधा उपलब्ध करण्याच्या नावाखाली रहिवाशांना वेठीस धरण्याचा प्रकार प्रशासनाने चालविला असल्याची टिका नागरिक करीत आहेत. दुरवस्था झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.