नव्या गटारीसाठी कोटीचा खर्च, जुन्या गटारीत कचरा मातीची भर

बेळगाव / प्रतिनिधी
एकीकडे कोटय़वधी निधी खर्च करून गटारीचे बांधकाम करण्यात येत आहे. दुसरीकडे असलेल्या गटारींमध्ये कचरा आणि माती घालून बुजविण्यात आल्या आहेत. चन्नम्मानगर येथील रेशन गोडावूनच्या परिसरातील गटारींची अशी अवस्था झाली असून, गटारींची स्वच्छता करण्याकडे मनपा प्रशासन लक्ष देईल का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
टिळकवाडी परिसरातील विविध विकासकामे राबवून स्मार्ट सिटी बनविण्याचा आटापिटा प्रशासनाने चालविला आहे. काही ठिकाणी असलेल्या चांगल्या गटारी बुजवून नवीन गटारी बांधण्यासाठी निधी खर्च केला जात आहे. पण राणी चन्नम्मा नगर येथील रेशन गोडावून असलेल्या परिसरातील गटारींमधील कचरा काढण्याकडे मनपा प्रशासनाने कानाडोळा केला आहे. येथील गटारी पूर्णपणे बुजल्या असून, कचरा आणि माती भरली आहे. गटारीवर घालण्यात आलेल्या फरशा तुटुन गटारीमध्ये कोसळल्या आहेत. परिणामी परिसरातील सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. रेशन धान्य नेण्यासाठी येणाऱया वाहनांना देखील गटारीचा धोका निर्माण झाला आहे. गटारी पूर्णपणे बंद झाल्याने सांडपाण्याचा निचरा तसेच पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही. परिणामी सांडपाणी साचून दुर्गंधी पसरली आहे. रेशन दुकानात येणाऱया नागरिकांना रांगेत थांबावे लागते. त्यामुळे दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. तसेच डासांची उत्पत्ती होऊन आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. परिसरात नवीन गटार करण्यात आली आहे. पण याचा काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे संबंधीत अधिकाऱयांनी याकडे लक्ष देऊन गटारीची स्वच्छता करावी, तसेच मोडकळीस आलेल्या गटारीचे बांधकाम करावे, अशी मागणी होत आहे..