4 वर्षांनंतर प्रथमच मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघात समावेश, फिरकीपटू यजुवेंद्र चहल, शिखर धवन, पृथ्वी शॉला वगळले
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आगामी टी-20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी आघाडीचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनचे 15 सदस्यीय भारतीय संघात पुनरागमन झाले. अश्विनसाठी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये स्थान मिळण्याची ही तब्बल 4 वर्षांनंतरची पहिलीच वेळ ठरली. 34 वर्षीय अश्विनने यापूर्वी 2017 मध्ये मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतातर्फे शेवटचे प्रतिनिधित्व केले होते.
इशान किशन व वरुण चक्रवर्ती यांना आयपीएलमधील सातत्यपूर्ण प्रदर्शनाची पोचपावती या विश्वचषकासाठी मिळाली असून याचवेळी यजुवेंद्र चहल, शिखर धवन, पृथ्वी शॉ यांना डच्चू दिला गेला आहे. यंदाची टी-20 विश्वचषक स्पर्धा दि. 17 ऑक्टोबरपासून संयुक्त अरब अमिरात व ओमानमध्ये खेळवली जाणार आहे.
सातत्याने प्रगतिपथावर असलेल्या इशान किशन, अक्षर पटेल व वरुण चक्रवर्ती या त्रिकुटालाही संघात स्थान लाभले. 30 वर्षीय मुंबईकर फलंदाज सूर्यकुमार यादव पॉवर हिटिंग फलंदाजीच्या क्षमतेमुळे संघात समाविष्ट आहे.
34 वर्षीय अश्विन मागील 4 वर्षांपासून मर्यादित षटकांसाठी संघातून बाहेर असला तरी आयपीएलमध्ये तो सातत्याने खेळत आला. शिवाय, ज्यावेळी संधी मिळाली, त्यावेळी भारतीय संघातूनही त्याने लक्षवेधी खेळ साकारला.
या निवडीत अनुभवी डावखुरा फलंदाज शिखर धवन व लेगस्पिनर यजुवेंद्र चहल यांना वगळणे आश्चर्याचे ठरले. आतापर्यंत मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये हमखास स्थान लाभत आलेल्या चहलऐवजी राहुल चहरला पसंती दिली गेली. सलामीसाठी केएल राहुल, रोहित शर्मा व इशान किशन असे तीन पर्याय असल्याने धवनचा विचार झाला नाही.
अश्विन हा संघातील एकमेव ऑफस्पिनर आहे. वरुण हा आपल्या गूढ फिरकी गोलंदाजीच्या क्षमतेमुळे या स्पर्धेत सरप्राईज पॅकेज ठरु शकेल, असे निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा म्हणाले. हार्दिक पंडय़ा पूर्ण तंदुरुस्त असून आता तो 4 षटकांचा कोटा पूर्ण करु शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अष्टपैलू रविंद्र जडेजासाठी कव्हर म्हणून अक्षर पटेलला निवडकर्त्यांनी पसंती दिली.
पृथ्वी शॉ व श्रेयस अय्यर यांना या संघात स्थान मिळू शकलेले नाही. अर्थात, अय्यरला शार्दुल ठाकुर व दीपक चहर यांच्यासह राखीव खेळाडूंमध्ये सामावून घेतले गेले आहे. शार्दुल ठाकुर सध्या सर्वोत्तम बहरात असून इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेत त्याने प्रभावी खेळ साकारला आहे. भारतीय संघ या विश्वचषक स्पर्धेत दि. 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्धच्या लढतीने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल.
भारतीय क्रिकेट संघ ः विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंडय़ा, रविंद्र जडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रित बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.
राखीव खेळाडू- श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकुर, दीपक चहर.
महेंद्रसिंग धोनीकडे टीम मेंटरची नवी भूमिका!

2007 टी-20 व 2011 वनडे विश्वचषक जिंकून देणारा अव्वल माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला भारतीय व्यवस्थापनाने या टी-20 विश्वचषकासाठी टीम मेंटर म्हणून नियुक्त केले. धोनी या स्पर्धेदरम्यान मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या साथीने कार्यरत असेल, असे बीसीसीआय सचिव जय शाह यांनी नमूद केले. आपण दुबईत असताना धोनीशी संवाद साधला आणि त्यानेही मंडळाचा प्रस्ताव आनंदाने स्वीकारला, असे शाह याप्रसंगी म्हणाले.
धोनीसमोर हा प्रस्ताव ठेवण्यापूर्वी मी कर्णधार विराट कोहली व उपकर्णधार रोहित शर्मा यांच्याशी याबाबत चर्चा केली आणि त्यांनीही होकार दर्शवला, याचा शाह यांनी येथे उल्लेख केला.
40 वर्षीय धोनीने गतवर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. 2019 विश्वचषक उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्धचा सामना त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा ठरला.
धोनीची निवड ती कसर भरुन काढण्यासाठी?
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये धोनीचे योगदान सातत्याने अफलातून राहिले. प्रचंड दडपण असले तरी चेहऱयावरील रेषही हलू न देता एकापेक्षा एक मास्टरक्लास चाली रचत व सहकाऱयांकडूनही सर्वोत्तम कामगिरी करवून घेण्यात धोनी मास्टरमाईंड ठरला. आयसीसी स्पर्धा कशा जिंकाव्यात, याचा वस्तूपाठही धोनीनेच घालून दिला. मात्र, आधुनिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज व नेतृत्वात धोनीचा उत्तराधिकारी विराट कोहलीला मात्र आयसीसी चषकाने सातत्याने हुलकावणी दिली आहे. फलंदाजीत सम्राट ठरलेला विराट नेतृत्वात अपयशी ठरत आला आहे. अनेकदा उपांत्य फेरीचा अडथळा संघाला सर करता आलेला नाही. नेमकी हीच कसर भरुन काढण्यासाठी धोनीला टीम मेंटर म्हणून पाचारण केले गेले असण्याची शक्यता आहे.